सुवर्णक्षण साकार ! चिपी विमानतळावर पहिल्या विमानाचं लँडिंग
नारायण राणे, अनिल परब, दादा भुसे, विनायक राऊत, रविंद्र चव्हाण, निलेश राणे यांच्यासह दिग्गज नेते पहिल्या विमानाने दाखल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह मान्यवरांनी केलं स्वागत
पहिल्या विमानात कोण कुठल्या रांगेत ? सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडीओ ; भाजपकडून शिवसेनेला चिमटा
कुणाल मांजरेकर
मागील २० वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्हा वासीयांना प्रतीक्षा लागून असलेला सुवर्णक्षण साकार झालाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावर व्हीव्हीआयपी प्रवाशांना घेऊन पहिलं विमान अखेर दाखल झालं आहे. या विमानाचं प्रशासनाच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आलं. दरम्यान, या विमानातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ मध्ये केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यासह भाजपचे नेते पहिल्या रांगेत तर विनायक राऊत, अनिल परब यांच्यासारखे शिवसेनेचे दिग्गज मागील आसनांवर बसलेले दिसत आहेत. या व्हिडीओ वरून भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली आहे.
चिपी विमानतळाचे आज उदघाटन होत आहे. मुंबईतून पहिलं विमान चिपी कडे मार्गस्थ होऊन काही वेळापूर्वी जिल्ह्यात दाखल झालं. या विमानातून केंद्रीयमंत्री नारायण राणे, राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह खासदार विनायक राऊत, कृषीमंत्री दादा भुसे, खासदार अरविंद सावंत, आमदार दीपक केसरकर, मंत्री अदिती तटकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, पोलीस महासंचालक संजय पांडे, माजी खासदार निलेश राणे, आमदार प्रसाद लाड, प्रमोद जठार, निरंजन डावखरे यांच्यासह दिगग्ज नेते चिपी विमानतळावर दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दिग्गजांनी स्वतः या प्रवाशांचं स्वागत केलं.
दरम्यान, या विमानाचा आतील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ मध्ये नारायण राणे यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते आणि काही पदाधिकारी पहिल्या काही रांगेत बसलेले दिसून येत आहेत. तर मंत्री अनिल परब, खासदार विनायक राऊत यांच्यासह शिवसेनेचे नेते मागील आसनावर बसलेले आढळून आले आहेत. या व्हिडीओ वरून भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.