विमानसेवेच्या निमित्ताने सिंधुदुर्गच्या विकासाचं नवं द्वार उघडतंय !
सुरेश प्रभूंनी व्यक्त केली भावना ; परदेशात असल्यानं कार्यक्रमात सहभागी होता येत नसल्याची खंत
कुणाल मांजरेकर
भाजपचे नेते, माजी केंद्रीयमंत्री खा. सुरेश प्रभू यांनी चिपी विमानतळाच्या लोकार्पण कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत. विमानसेवेच्या निमित्ताने सिंधुदुर्गच्या विकासाचं नवं द्वार उघडत असून प्रगतीसाठी आकाश मोकळे होत असल्याचे खा. प्रभू यांनी म्हटले आहे.
माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळा शनिवार दि. ९ ऑक्टोंबर रोजी होत आहे. अतिशय आनंददायक असा हा क्षण आहे. परदेशात असल्याने मला प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नसले तरी मी मनोमन त्यात सहभागी आहे. या विमानतळाच्या निर्मितीसाठी व केंद्र सरकारच्या उडान योजनेच्या अंतर्गत आणण्यासाठी मी माझ्या मंत्रीपदाच्या काळात योगदान देऊ शकलो ही माझ्या मायभूमीच्या विकासासाठी केलेली सेवा आहे असेच मी मानतो. ‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी असे म्हणतात. माझा सिंधुदुर्ग जिल्हा मुळातच स्वर्गाहून सुंदर आहे. आजच्या विमानसेवेने इथल्या विकासाचे नवीन द्वार उघडत आहे, प्रगतीसाठी आकाश मोकळे होत आहे. कोकणवासीयांच्या या आणखी एका सुंदर स्वप्नाच्या पुर्ततेसाठी मी आनंद व्यक्त करतो आणि इथल्या युवा पिढीच्या शाश्वत विकासासाठी मनःपूर्वकशुभेच्छा देतो, असं सुरेश प्रभूंनी म्हटलं आहे.