निःस्वार्थी… निष्ठावंत नेतृत्व !
भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य देवदत्त उर्फ दत्ता सामंत वाढदिवस विशेष !
कुणाल मांजरेकर
राजकारणात येणारा प्रत्येक जण स्वतःचं नाव आणि पैसा कमावण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने धडपडत असतो. पण अशी खूप थोडी माणसं असतात, ज्यांना स्वतःचं नाव कमावण्यासाठी कोणत्याही पदाची गरज नसते. असाच गेली तीन दशके सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय क्षितिजावर चमकणारा ध्रुवतारा म्हणजे कट्टर राणे समर्थक देवदत्त उर्फ दत्ता सामंत ! दत्ता सामंत यांना ध्रुवतारा शब्द वापरण्याचं प्रयोजन म्हणजे त्यांचं राजकीय क्षेत्रात असलेलं एक अढळ स्थान ! दत्ता सामंत हे कधीही स्वतःला राजकारणी अथवा राजकीय नेता समजत नाही… पण त्यांच्या नसानसात भरलेल्या “दातृत्व आणि नेतृत्व” गुणांमुळे सिंधुदुर्गातील जनतेनेच त्यांना ध्रुवबाळा सारखं एक स्वतःचं असं अढळ स्थान दिलं आहे. हे असं स्थान आहे, ज्याला धक्का लावणं सोडाच, त्याच्या आजूबाजूला फिरकणं देखील कुणाला शक्य होणार नाही… त्यामुळेच “दत्ता सामंत… बस नाम ही काफी है” असं म्हटलं जातं. केंद्रीयमंत्री नारायण राणेंचे चाहते असलेल्या दत्ता सामंत यांनी आजपर्यंत कधीही कोणत्याही पदाची अपेक्षा ठेवली नाही. “नारायण राणे हाच माझा आत्मा” असं समजणाऱ्या दत्ता सामंत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचं व्रत जोपासलं आहे. ते सुद्धा कोणत्याही पद, पैशाची अपेक्षा न ठेवता… मालवण तालुक्यातील घुमडे गावचे सुपुत्र असलेल्या दत्ता सामंत यांचा आज ७ जानेवारी रोजी ५५ वा वाढदिवस ! त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा थोडक्यात घेतलेला आढावा ….
१९९० चा तो काळ ! त्यावेळी कोकण हा समाजवाद्यांचा बालेकिल्ला म्हणुन ओळखला जायचा. अशावेळी नारायण राणे नावाचं वादळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मालवण- कणकवली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सिंधुदुर्गात पाठवलं, त्यावेळी प्रचाराला अवघे काही दिवस शिल्लक होते. त्यामुळे एवढ्या अल्पशा कालावधीत नारायण राणे येथून निवडून येऊच शकत नाहीत, असा कयास अनेकांनी मांडला होता. मात्र ही सर्व भाकिते दूर सारुन नारायण राणे येथून आमदार म्हणून निवडून आले. नारायण राणे यांच्या या विजयात काही मोजक्या शिलेदारांनी राणेसाहेबांसोबत जीवाचे रान करुन प्रचाराची धुरा सांभाळली होती. यामधीलच एक तरुण आणि आक्रमक युवा कार्यकर्ता म्हणजे दत्ता सामंत होय. याच कालावधीत घुमडे गावचे शिवसेना शाखाप्रमुख म्हणून दत्ता सामंतांच्या राजकीय वाटचालीस प्रारंभ झाला. यानंतर त्यांनी घुमडे गावचे सरपंच पदही यशस्वीपणे सांभाळले. त्यामुळे शिवसेनेच्या उपतालुकाप्रमुखपदी त्यांना संधी मिळाली. १९९५ ते २००५ या दहा वर्षांचा काळ खऱ्या अर्थाने दत्ता सामंतांचा होता. या कालखंडाने आक्रमक दत्ता सामंत अनुभवला. त्यांच्यातील आक्रमकता व धडाडी पाहून नारायण राणेंनी तालुकाप्रमुखपदी त्यांची बढती केली. खोटले परिसराला चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. या नैसर्गिक आपत्तीत अनेक घरे उध्वस्त झाली होती. याची माहिती मिळताच दत्ता सामंत यांनी कोणाच्याही मदतीची वाट न पहाता स्वत: मदतकार्य सुरु केले. कार्यकर्त्यांना घेऊन काही तासातच घरे पुर्ववत उभारुन दिली. धान्य, कौले भरुन वाहने आणून मदतकार्य केले. तालुकाप्रमुख म्हणून त्यांच्या धडाडीची खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही दखल घेत सन्मानाने त्यांना मातोश्रीवर पाचारण करुन त्यांचा सत्कार केला. नारायण राणे काँग्रेसमध्ये गेल्यावर दत्ता सामंत यांच्याकडे जिल्हा संघटक पदाची जबाबदारी देण्यात आली होती. या पदालाही त्यांनी सन्मान मिळवून दिला. त्यांच्या कामाची पद्धत पाहून राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र राजकारणात अधिक रस नसलेल्या श्री. सामंत यांनी या पदाचा राजीनामा देत राणेसाहेबांचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणे अधिक पसंत केले.
अनेक वर्षे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या राजकिय क्षेत्रात दत्ता सामंत यांनी काम केले. मात्र २०१४ च्या लोकसभा- विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर पक्षाला आलेली मरगळ दूर करण्यासाठी नारायण राणेंनी दत्ता सामंत यांच्यावर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली. या पदाला पुरेपुर न्याय देत दत्ता सामंत यांनी काँग्रेस पक्षाला आलेली मरगळ दूर करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. कार्यकर्त्यांचा प्रचंड गोतावळा असणारे दत्ता सामंत कधीही ‘साहेब’ बनले नाहीत, हाच दत्ता सामंत यांच्या स्वभावातील महत्वाचा गुण म्हणून मानला जातो. नारायण राणे यांनी काँग्रेसचा त्याग करून स्वत:च्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केल्यानंतर दत्ता सामंत यांचीच जिल्हाध्यक्ष पदावर निवड केली. नवीनच स्थापन झालेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष जिल्ह्यात कोणता चमत्कार घडविणार? असा राजकिय विरोधकांचा होरा असताना स्वाभिमानच्या स्थापनेनंतर सिंधुदुर्गात झालेल्या प्रत्येक निवडणूकीत दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने घवघवीत यश मिळविले आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे तसेच अन्य वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यातून दत्ता सामंत यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला हे यश संपादन करुन दिले. दत्ता सामंत यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर “दत्ता तिथे सत्ता” अशी आरोळी कार्यकर्त्यांनी सोडली होती. हे विधान सत्य करुन दाखविण्याचे काम दत्ता सामंत यांनी केले.
२०१९ मधील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राणेसाहेबानी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विसर्जित केला. त्यावेळी कुडाळ- मालवणात कोणतीही तयारी नसताना निवडणुकीच्या रिंगणात कोणाला उतरवायचे ? असा प्रश्न निर्माण झाला असता राणेसाहेबांच्या डोळ्यासमोर एकच नाव आलं, ते म्हणजे दत्ता सामंत ! वास्तविक या निवडणुकीत दत्ता सामंत यांनी कोणतीही तयारी केली नव्हती. या उलट विद्यमान आमदाराचा दांडगा जनसंपर्क होता. अशावेळी येथून निवडणूक लढवणे म्हणजे जिकरीचे होते. मात्र राणेसाहेबांचा आदेश येताच एका क्षणात दत्ता सामंत यांनी आमदारकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा निर्णय घेतला. दत्ता सामंत अर्ज भरणार, ही माहिती मिळताच केवळ दोन दिवसात त्यांचा अर्ज भरताना हजारोंची गर्दी उसळली. ही गर्दी पाहून विरोधकांना देखील धडकी भरली. त्यातूनच दत्ता सामंत यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला. या घटनेमुळे त्यांना निवडणूक लढवता आली नसली तरी जनतेच्या मनातील आमदार म्हणून त्यांची ओळख कायमस्वरूपी निर्माण झाली.
दत्ता सामंत हा राजकारणातील कोहिनुर हिरा आहे. त्यामुळे असा हिरा आपल्याकडे असणे अशी इच्छा कोणा राजकीय पक्षाच्या वरिष्ठांनी बाळगणे चुकीचे नाही.त्यामुळे दत्ता सामंत यांनाही नारायण राणेंनी साथ सोडून पक्षांतर करण्यासाठी वेगवेगळी आमिषे दाखवण्यात आली. मात्र राणेसाहेब हेच आपले सर्वस्व असल्याचे सांगून त्यांनी सर्व ऑफर्स धुडकवल्या. मात्र एखादा योद्धा पराजित करणं कठीण असलं तर त्याला बदनाम केलं जातं. त्याप्रमाणे दत्ता सामंत यांच्याबाबतही अनेक अफवा पसरवून त्यांची बदनामी करण्याचे षडयंत्र आखले अधून मधून सातत्याने आखले जाते. मात्र दत्ता सामंत यांच्यावर नारायण राणेंचा असलेला विश्वास, यामुळे आजपर्यंत अनेकदा ही षड्यंत्र रचणारे तोंडावर आपटले आहेत.
मध्यंतरी दोन वर्षे कोरोनाचे संकट देशा समोर उभे ठाकले होते. २०२० मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेचा सिंधुदुर्ग जिल्ह्याला फारसा फटका बसला नव्हता. मात्र २०२१ मध्ये आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सिंधुदुर्ग जिल्ह्यात हाहाःकार उडवला. ऑक्सिजन अभावी एखाद्या जनावरा प्रमाणे डोळ्यासमोर माणसं मरत होती. पैसा असूनही आपली माणसं वाचवणं, अनेक श्रीमंतांना देखील शक्य होत नव्हते. हॉस्पिटलना देखील ऑक्सिजन मिळत नव्हता. अशावेळी देवदूत बनून आलेल्या दत्ता सामंत यांनी स्वतःच्या पदरचे लाखो रुपये ओतून रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करून दिला. सरकारी रुग्णालये देखील ऑक्सिजन साठी दत्ता सामंत यांच्यावर अवलंबून राहात होती. कुंभारमाठ इथले शासकीय कोविड सेंटर तर शासकीय मदतीपेक्षा दत्ता सामंत यांच्याकडून मिळणाऱ्या ऑक्सिजन, औषधांवर अवलंबून होते. ऑक्सिजनसह लाखो रुपयांची औषधे, अन्य साहित्य या काळात दत्ता सामंत यांनी उपलब्ध करून दिली. त्यामुळेच मालवणसह जिल्ह्यात अनेकांचे प्राण वाचू शकले. त्यामुळे “देवदूत” ही नवीन उपमा दत्ता सामंत यांच्या नावासमोर उभी राहिली. या कालावधीत स्वतःची इनोव्हा गाडी त्यांनी कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करून दिली.
राजकीयदृष्ट्या मागासलेल्या कोकणला न्याय, आत्मसन्मान मिळवून दिला तर तो केवळ आणि केवळ माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनीच ! मात्र साक्षात परमेश्वराला देखील वनवास चुकला नाही. त्याप्रमाणे उपेक्षित कोकणला विकासाची दिशा दाखवणाऱ्या नारायणराव राणे यांना २०१४ च्या निवडणुकीत पराभव पत्कारावा लागला. हा पराभव प्रत्येक राणे समर्थकासाठी धक्कादायक होता. या पराभवामुळे राणे साहेबांचे नुकसान झाले नाही तर आपला सिंधुदुर्ग जिल्हा विकासाच्या वाटेवरून दूर फेकला गेला. यानंतर झालेल्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांच्या आग्रहाखातर दत्ता सामंत यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांचा उमेदवारी अर्ज भरताना झालेली गर्दी हीच त्यांच्या विजयाची नांदी देणारी होती. मात्र तांत्रिक बाबींची पूर्तता न केल्याने विरोधी उमेदवाराच्या हरकतीनंतर त्यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला. त्यामुळे विरोधी उमेदवाराचा विजय सोपा झाला. मात्र राणे साहेबांच्या या पराभवाचे शल्य आजही प्रत्येक राणे समर्थकाच्या मनात आहे. आज राणे साहेबांचे ज्येष्ठ सुपुत्र, माजी खासदार निलेश राणे यांनी कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघातून निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केली आहे. दोन्ही तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांच्या विजयासाठी कंबर कसली आहे. यात दत्ता सामंत यांचाही सहभाग आहे. निलेश राणे यांना कुडाळ मालवण मतदार संघातून विजयी करत राणे साहेबांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी दत्ता सामंत सक्रिय झाले आहेत. याचाच एक भाग म्हणून अलीकडील काही महिन्यात ठाकरे गटाच्या दिग्गजांचे त्यांनी भाजपात प्रवेश करून घेतले आहेत. यामध्ये प्रामुख्याने देवबागच्या पं. स. सदस्य मधुरा चोपडेकर, नादार केळूसकर, मकरंद चोपडेकर यांना त्यांनी भाजपात दाखल करून घेतले. तसेंच आंबडोस सरपंच सुबोधिनी परब यांच्यासह संपूर्ण ग्रामपंचायत, मसूरेचे माजी पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर, तेंडोली सरपंच रामचंद्र राऊळ यांसह अनेक लोकप्रतिनिधींना भाजपात दाखल करून घेत त्यांनी पक्ष संघटना मजबूत करत निलेश राणे यांचे हात बळकट करण्यासाठी प्रयत्न केले. आगामी काळात राणे साहेब, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष जिल्ह्यात मजबूत करण्यासाठी ते झटत आहेत.
दोन महिन्यांपूर्वी आचरा ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. मालवण तालुक्यातील सर्वात मोठ्या या ग्रामपंचायतीसाठी ठाकरे गटाच्या आमदार, खासदारांनी प्रतिष्ठा केली होती. त्यामुळे या ठिकाणचा भाजपचा विजय निलेश राणे यांचे हात बळकट करणारा ठरणार असल्याने दत्ता सामंत यांनी तन, मन, धन अर्पून कोणत्याही परिस्थितीत आचरा ग्राम पंचायत निवडून आणायचे शिवधनुष्य उचलले. निवडणूकपूर्व कलात ही ग्रामपंचायत भाजपासाठी धोकादायक ठरण्याचे अंदाज असताना दत्ता सामंत यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेत या ग्रामपंचायतीवर भाजपाची एकहाती सत्ता आणून दाखवली. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत निलेश राणे यांना कुडाळ मालवण मधून आमदार करण्याचा विडा दत्ता सामंत यांनी उचलला आहे. त्यासाठी भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देण्याचव काम ते करीत असून गावागावात संघटना मजबूत करण्यावर त्यांनी लक्ष दिला आहे. राजकारणापेक्षा समाजकारणाला त्यांनी अधिक महत्व दिले आहे. अशा या धुरंदर नेत्याचा आज ५५ वा वाढदिवस दत्ता सामंत मित्रमंडळाकडून साजरा केला जात आहे. यानिमित्ताने कुंभारमाठ येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले असून या लोकनेत्याला “कोकण मिरर” परिवाराकडून वाढदिवसानिमित्य खूप साऱ्या शुभेच्छा !!!!