२०२४ मध्ये निलेश राणेंना आमदार बनवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ; अन्यथा माझ्या आयुष्यातील हा शेवटचा वाढदिवस असेल…
५५ व्या वाढदिनी आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात भाजपा नेते दत्ता सामंत यांची ना. नारायण राणेंच्या उपस्थितीत भीष्मप्रतीज्ञा
शतप्रतिशत भाजपासाठी कटीबद्ध ; उद्या येथील खासदार भाजपाचाच असेल आणि तिन्ही आमदार पण भाजपचेच असतील : दत्ता सामंत
कार्यकर्त्यांच्या विराट गर्दीत दत्ता सामंत यांचा वाढदिवस साजरा ; केंद्रीय मंत्री नारायण राणे, सौ. नीलम राणे यांची प्रमुख उपस्थिती
मालवण | कुणाल मांजरेकर
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य, उद्योजक दत्ता सामंत यांचा ५५ वा वाढदिवस त्यांच्या कुंभारमाठ येथील निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या विराट गर्दीत जल्लोषी वातावरणात साजरा झाला. या सोहळ्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे, सौ. नीलम राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आज नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण भाजपात सक्रिय आहोत. शत प्रतिशत भाजपा हे पक्षाचे धोरण आहे. त्यामुळे उद्याच्या निवडणुकीत इथला खासदार पण भाजपचा असेल आणि तिन्ही आमदार पण भाजपचेच असतील, असे दत्ता सामंत यांनी सांगून २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत निलेश राणे यांना आमदार बनवल्या शिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. जर ते शक्य झाले नाही तर पुढील वर्षीपासून मी वाढदिवस साजरा करणार नाही. माझा हा शेवटचा वाढदिवस असेल, अशी भीष्मप्रतिज्ञा दत्ता सामंत यांनी केली.
भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य उद्योजक दत्ता सामंत यांचा ५५ वा वाढदिवस केंद्रीय मंत्री नारायण राणे, सौ. निलमताई राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुंभारमाठ निवासस्थानी साजरा करण्यात आला. यावेळी सौ.दिव्या देवदत्त सामंत, निला तिरोडकर, कु. सान्वी सामंत, कु. जय सामंत, संदीप कुरतडकर, बाळू कुबल, सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, दीपक पाटकर, सुनील घाडीगावकर, राजा गावडे, मधुकर चव्हाण, घुमडे सरपंच स्नेहल बिरमोळे, बाळा गोसावी, सरोज परब, माजी उपसभापती राजू परुळेकर, कुंभारमाठ सरपंच पूनम वाटेगावकर, आप्पा लुडबे, राजू बिडये, बाळा माने, दीपक नारकर, संदीप साटम, सुशांत घाडीगावकर, उमेश बिरमोळे, मंदार लुडबे, मकरंद राणे, अमोल केळूसकर, राजेंद्र प्रभुदेसाई, दयानंद प्रभुदेसाई, प्रशांत परब, निलेश बाईत, ऋषी पेणकर, सुधीर वस्त, गुरामवाडी सरपंच शेखर पेणकर, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, अनंत राऊत, अविनाश राऊत, सुधीर साळसकर, संग्राम साळसकर, महेश सारंग, विशाल ठाकूर यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी दत्ता सामंत म्हणाले, माझ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण द्यायला मी राणेसाहेबाना भेटायला गेलो. त्यांनी अगोदरच पुणे येथे दोन कार्यक्रम घेतले होते. ते रद्द करून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आशीर्वाद देण्यासासाठी राणेसाहेब आणि वहिनी येथे उपस्थित राहिल्या. त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. १९८८ पासून मी शिवसेनेचे काम करतो. त्यानंतर राणेसाहेब आल्यावर मी त्या वेळपासून शिवसेनेचे काम करत आहे. भाजपात राणे साहेब गेल्यावर आम्ही १०० % भाजपात आहोत. १९९० मध्ये राणेसाहेब जिल्ह्यात आल्यानंतर आमच्या सारखे वाल्याचे वाल्मिकी त्यांनी जिल्ह्यात बनवले. राणेसाहेब मंत्री झाले, मुख्यमंत्री झाल्यानंतरही आमच्या सारख्या कार्यकर्त्याला रस्त्यावर बघितल्यानंतर गाडीत बसवायचे. एवढा मान कोणी दिलेला बघितला नाही. असे प्रेम राणेसाहेब, वहिनी यांनी आम्हाला दिले. ३३ वर्षात राणेसाहेब कधीच माझ्यावर रागावले नाहीत.
राणेसाहेबांनी माझ्या सारखे अनेक कार्यकर्ते घडवले. मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. माझा भाचा अचानक वारला. साहेबाना कळलं तेव्हा मुंबईत पाच मजले पायी चढून ते सांत्वन करायला गेले. एवढे कौटुंबिक नाते आम्हा सर्वांशी राणेसाहेबांचे आहे.
२०१४ मध्ये राणेसाहेबांचा पराभव व्हायला नको होता. पण त्या कालावधीत विरोधक वेगवेगळ्या प्रकल्पावरून खोटं बोलले. त्यात राणेसाहेब राज्याचे प्रचारप्रमुख असल्याने येथे प्रचाराला उतरले नाहीत. त्यामुळे त्यांचा पराभव झाला. हा पराभव आम्हाला पण लागला आहे. आज २०२४ आहे, आज आम्ही भाजपात आहोत.
राणेसाहेबांसोबत आता पालकमंत्री रवींद्र चव्हाण आहेत. निलेश राणे आहेत, नितेश राणे आहेत, सर्वच मंडळी अतिशय चांगले काम करीत आहेत. आज माझ्या ५५ व्या वाढदिवसाला राणेसाहेब स्वतः आले आहेत. त्यामुळे साक्षात परमेश्वराच्या शुभेच्छा मला मिळाल्या या भावनेचा मी आहे.तुम्ही जी जबाबदारी माझ्यावर द्याल, माझ्या कार्यकर्त्यावर द्याल, ती जबाबदारी पार पाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे सांगून राणे साहेबांना सोडून मी कुठेही जाणार नाही. राजकारणात मी आलो तो राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली आलो, आणि राजकारण संपवायचे असेल तर राणे साहेबांच्यांच नेतृत्वाखाली संपवणार. मला कुठलीही महत्वाकांक्षा नाही. राणेसाहेब, पालकमंत्री चव्हाण साहेब जी जबाबद्दारी देतील ती पार पाडणार असा शब्द यावेळी दत्ता सामंत यांनी दिला.