सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत वेंगुर्ला येथेच होणार ; निधीला प्रशासकीय मंजुरी
राजकीय स्वार्थासाठी विरोधकांकडून प्रकल्पाबाबत जाणूनबुजून गैरसमज पसरवण्याचे काम ; पाणबुडी प्रकल्पाबाबत मंत्रालयात पालकमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रस्तावित पाणबुडी प्रकल्प हा जिल्ह्याच्या पर्यटन व विकासाला चालना देणारा प्रकल्प असून हा आमच्या शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. तसेच नियोजनानुसार कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प वेंगुर्ला येथूनच कार्यान्वित होणार आहे. मात्र आपल्या राजकीय स्वार्थासाठी विरोधक या प्रकल्पाबाबत जाणूनबुजून गैरसमज पसरवत असल्याचा आरोप पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला आहे.
जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्पासंदर्भात आज मंत्रालयात पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांची बैठक झाली. या बैठकीत प्रस्तावित पाणबुडी प्रकल्पाची सद्यस्थिती व वस्तुस्थिती जाणून घेतली. या प्रकल्पासाठी आवश्यक निधीसाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. पाणबुडी पर्यटन विकासासाठी मंजूर निधीपैकी काही निधी हा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे(एमटीडीसीकडे) वर्ग करण्यात आला आहे. या प्रस्तावित प्रकल्पासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही व सदर प्रकल्प सकारात्मक पूर्ण होण्याच्या दृष्टीने विभागाने तातडीने प्रयत्न करावेत असे निर्देश यावेळी उपस्थितांना दिले. या बैठकीला पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळच्या व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी- शर्मा यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे हे व्हर्च्युअल माध्यमातून उपस्थित होते.