हिम्मत असेल तर नावं जाहीर करा … वैभव नाईकांचं नारायण राणेंना खुलं आव्हान
राणेंच्या आरोपानंतर शिवसेना देखील आक्रमक ; आमच्या कडील पुरावे देखील बाहेर काढू
कुणाल मांजरेकर
मालवण : चिपी विमानतळाच्या उदघाटन कार्यक्रमात शिवसेनेतील हप्तेखोर नेत्यांची नावं उघड करणार असल्याचा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंना ओपन चॅलेंज दिलंय. हिंम्मत असेल तर राणेंनी ही नावं जाहीर करावीतच. आम्ही पण मुंबई गोवा महामार्गाचं काम उशिराने सुरू का झालं ? सुरुवात झाल्यानंतर कोणी चिखलफेक करून काम थांबवलं ? मग कुठल्या वाटाघाटीत हे काम पुन्हा सुरू सुरू झालं ? हे सगळं जाहीर करू, असं प्रत्युत्तर आ. नाईक यांनी दिलं आहे.
रेडी पोर्टचं काम अनेक वर्षे सुरू आहे. रेडीपोर्ट मध्ये कोणाची भागीदारी आहे ? या कामाचा कोट्यवधीचा फायदा कोणाला मिळतो, हे पण आम्हाला जाहीर करावं लागेल, असं वैभव नाईक यांनी म्हटलं आहे. नारायण राणे नेहमी शिवसेनेवर आरोप करतात. पण विकास कामात तुमचा सहभाग किती आहे, ते सांगा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार विनायक राऊत, माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे चिपी विमानतळ सुरू होत आहे. कोणी सांगितले म्हणून विमानतळ होत नाही. त्यासाठी शेकडो परवानग्या आणाव्या लागतात, त्या परवानग्या आणण्याचे काम आम्ही पूर्ण केले आहे.
जिल्ह्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नांतून शासकीय मेडिकल कॉलेज सुरू होत आहे. या कॉलेजला विरोध कोणाचा आहे ? विजय सावंत साखर कारखाना आणत होते, त्याला विरोध कोणी केला ? असा सवाल करीत राणे ७ ते ८ वर्ष राज्यात उद्योगमंत्री होते, त्यांनी जिल्ह्यात कोणते उद्योग आणले, याचे उत्तर देखील उद्याच्या जाहीर सभेत द्यावे, असे वैभव नाईक यांनी म्हटले आहे.