मुख्यमंत्र्यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याची “मत्स्यव्यवसाय” विभागाने घेतली धास्ती !
गस्तीनौकेची तातडीने निघाली “ऑर्डर” ; मुख्यमंत्र्यांकडे तक्रार होण्याच्या शक्यतेने निर्णय
आ. वैभव नाईक यांच्यामार्फत गस्तीनौकेसाठी सुरू होता पाठपुरावा
कुणाल मांजरेकर
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी हद्दीत परराज्यातील बोटींचे अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे येथे तातडीने गस्तीनौका उपलब्ध करून देण्याची मागणी स्थानिक मच्छीमार करताना दिसतात. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करणारा मत्स्यव्यवसाय विभाग शुक्रवारी अचानक ऍक्टिव्ह झाला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने सिंधुदुर्गात दाखल होत आहेत. त्यामुळे गस्तीनौकेसाठी पाठपुरावा करणारे आमदार वैभव नाईक सागरी घुसखोरीचा प्रश्न मुख्यमंत्र्यांपर्यंत घेऊन जाण्याची शक्यता गृहीत धरून मत्स्यव्यवसाय विभागाने तात्पुरत्या स्वरूपात येथे भाड्याची गस्तीनौका उपलब्ध करून देण्याचा निर्णय शुक्रवारी तातडीने घेतला. सदरील नौका मालकाला त्याबाबतचे पत्रही सादर करण्यात आले असून आजपासून ही गस्तीनौका कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती पारंपरिक मच्छिमार नेते बाबी जोगी यांनी दिली.
सिंधुदुर्गच्या सागरी हद्दीत परराज्यातील पर्ससीन बोटींची घुसखोरी वाढली आहे. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी गस्तीनौका सुरू करण्याची मागणी मच्छिमारांतून करण्यात येत होती. आमदार वैभव नाईक यांनी सुध्दा या सागरी गस्तीनौकेसाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता. अलीकडेच मालवणच्या समुद्रात १०० हून अधिक परराज्यातील बोटींनी घुसखोरी केल्याचे निदर्शनास आले होते. त्यावेळी पारंपरिक मच्छिमार नेते तथा शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांनी मत्स्यव्यवसाय विभागाचे लक्ष वेधून तातडीने गस्तीनौका उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
मुख्यमंत्र्यांचा दौरा अन् मत्स्यव्यवसाय विभाग सक्रिय !
मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर परराज्यातील नौकांची घुसखोरी वाढली आहे. मात्र याकडे मत्स्यव्यवसाय विभाग दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक मच्छीमारांमध्ये तीव्र नाराजीची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सिंधुदुर्गात येत आहेत. त्यामुळे आमदार वैभव नाईक यांच्यामार्फत हा विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत जाण्याची शक्यता गृहीत धरून मत्स्यव्यवसाय विभागाने शुक्रवारी तातडीने हालचाली करत तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर सागरी गस्तीसाठी नौका उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी मत्स्यव्यवसाय विभागाकडे गस्तीसाठी असलेली लक्ष्मण भगत यांच्या मालकीची “शितल” ही गस्तीनौका पुन्हा एकदा सागरी गस्तीसाठी घेण्याचे निश्चित करून नौकामालकाला शुक्रवारी सायंकाळी उशिरा मत्स्यव्यवसाय कार्यालयात त्याबाबतचे पत्रही सादर करण्यात आले. यावेळी मच्छीमार नेते बाबी जोगी उपस्थित होते.