“या” तीन कोकण सुपुत्रांमुळेच कोकणचा शाश्वत विकास

उद्योग व्यापार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर यांची प्रतिक्रिया

कुणाल मांजरेकर

मालवण : कोकणच्या शाश्वत विकासासाठी प्रयत्न करणारे आणि ते पूर्णत्वास नेणारे कोकणातील तीनच नेते आहेत. यामध्ये प्रामुख्याने माजी रेल्वेमंत्री कै. मधु दंडवते, केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे आणि खासदार सुरेश प्रभू यांचा समावेश असल्याची प्रतिक्रिया भाजपचे उद्योग- व्यापार आघाडी  जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केली आहे. 

कै. मधु दंडवते, माजी रेल्वेमंत्री

         कै. मधु दंडवते यांनी कोकण रेल्वेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. तर नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात विमानतळ होण्यासाठी मुहूर्तमेढ रोवली. या दोन्ही प्रकल्पाला शासकीय चालना देण्याचं काम सुरेश प्रभु यांनी केले. दंडवते साहेबांनी कोकण रेल्वेची मुहूर्तमेढ रोवली यानंतर त्यात आधुनिकीकरणाची साथ सुरेश प्रभूंनी केंद्रीय रेल्वेमंत्री असताना जोडली. तसेच नारायण राणे मुख्यमंत्री असताना सिंधुदुर्गाच्या विकासासाठी त्यांनी विमानतळाची मुहूर्तमेढ रोवली. त्याच्या परवानगीसाठी आवश्यक असणारी पूर्तता स्वतः लक्ष घालून सुरेश प्रभुंनी केंद्रीय नागरी उड्डानमंत्री असताना केली. सिंधुदुर्गात विमानतळ होणे शक्यच नव्हते कारण हे विमानतळ पूर्ण खाजगी स्वरूपाचे आहे. याला संरक्षण मंत्रालयातून परवानगी मिळणे खूप कठीण होते. प्रभुंनी स्वतः संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना विनंती करून व कागदपत्राची आवश्यक पूर्तता करून महत्त्वाची परवानगी मिळवून घेतली. त्याच्यामुळे हे विमानतळ ९ ऑक्टो5बर रोजी कार्यान्वित होत आहे. या विमानतळावरून सर्वसामान्यांना परवडेल अशा तिकीट दरातून प्रवास करता यावा म्हणून ही विमानसेवा केंद्राच्या उडान योजनेमध्ये मंजूर करून घेतली. देशातील  हे पहिले उदाहरण आहे की  विमानतळ सुरू व्हायच्या आधीच उडान योजनेत हे विमानतळ घेण्यात आले. याची तरतूद प्रभुंनी करून ठेवली होती. विमानतळाला आवश्यक परवाने देत असताना राज्य शासन आणि केंद्रशासन यांचा समन्वय घडवून आणण्याचे काम प्रभुंनी केले. कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता हे विमानतळ आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे म्हणुन प्रभु साहेबांनी मालवाहतुकीचा कार्गो हब होऊ शकतो का याची चाचपणी करून त्या परवानगीसाठी प्रयत्न पण सुरू केले होते. 

नारायण राणे, केंद्रीयमंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न साकारण्यासाठी सर्वांनी साथ द्या

उद्योगधंद्याच्या वाढीसाठी नारायण राणे प्रयत्न करत आहेत, त्यांना साथ देऊन मोठे उद्योग या ठिकाणी कसे येतील हे पाहिले पाहिजे. पर्यटनाचा नवीन आराखडा तयार करून त्यासाठी आवश्यक सुविधा आता उपलब्ध झाल्या असताना वेगळे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून कोकणामध्ये पर्यटन रिंग कशी उभी राहील याकडे पाहिले पाहिजे. सी वर्ल्ड, नाणार रिफायनरी, सिंधुदुर्ग किल्ल्याला लाईट शो असे प्रकल्प उभे राहणे आवश्यक आहे. आलेल्या पर्यटकाने कमीत कमी तीन ते चार दिवस सिंधुदुर्गात राहून पर्यटन केले तरच हे विमानतळ आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल व त्याचबरोबर पर्यटनाला चालना मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे की छोट्या गावातील जीडीपी वाढला तरच देशाचा जीडीपी वाढू शकतो. या संकल्पनेतून सिंधुदुर्गाचा जीडीपी वाढवून देशाचा जीडीपी वाढण्यासाठी आता सर्व नेत्यांनी हातभार लावला पाहिजे. यासाठी प्रभु वाणिज्य मंत्री असताना रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा केंद्राच्या चॅम्पियन सेक्टरमध्ये मंजूर करून कार्यान्वित केला होता. उद्योगधंद्यांना आवश्यक असणाऱ्या बऱ्याच सेवा-सुविधा आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उपलब्ध झाल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून देशाच्या नकाशावर झळकत आहे. आता आर्थिकदृष्ट्या सक्षम जिल्हा व्हावा असे मनोमनी वाटते. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मस्तकी सोन्याचा तुरा विमानतळाच्या रुपाने डोलावत आहे, त्याला आमच्या शुभेच्छा आहेत, असेही श्री. केनवडेकर यांनी म्हटले आहे

खासदार सुरेश प्रभू, माजी केंद्रीयमंत्री

सिंधुदुर्ग विमानतळावरून हेलिकॉप्टर सेवा सुरू व्हावी 

इतर राज्यांमध्ये हेलिकॉप्टरने प्रवासी वाहतूक केली जाते. त्याचा तिकीट दरही स्वस्त असतो. पंजाबमधून सिमला-कुलू-मनाली येथे जाण्यासाठी हेलिकॉप्टरचा सहाशे किलोमीटरचा प्रवास १२०० रुपयांमध्ये पूर्ण होतो. अशाच पद्धतीची हेलिकॉप्टर सेवा सिंधुदुर्ग ते मुंबई, सिंधुदुर्ग ते पुणे, सिंधुदुर्ग ते चेन्नई अशा प्रकारे व्हावी. यासाठी वेगळा प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात या विमानतळावर व्हावा यासाठी खासदार सुरेश प्रभू यांनी आराखडा तयार करून विमान प्राधिकरणाकडे यापूर्वीच दिला आहे. याकडे आता सर्व नेत्यांनी लक्ष देऊन हा प्रकल्प कार्यान्वित कसा होईल हे पाहिले पाहिजे, असे विजय केनवडेकर यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!