चिपी विमानतळाच्या उद्याच्या कार्यक्रमात शिवसेनेतील हप्तेखोरांची नावं उघड करणार !

नारायण राणेंच्या वक्तव्याने खळबळ ; उद्याचा उदघाटन सोहळा वादग्रस्त ठरणार ?

कुणाल मांजरेकर

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे उद्घाटन उद्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे हे देखील उपस्थित राहणार आहेत. या विमानतळ उदघाटन कार्यक्रमाला ठराविक जणांनाच प्रवेश असला तरी यावेळी शिवसेना आणि भाजप कडून जोरदार शक्तिप्रदर्शन पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, या उदघाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर खुद्द नारायण राणे यांनीच उद्याच्या उद्घाटन कार्यक्रमात शिवसेनेच्या नेत्यांबद्दल मोठा गौप्यस्फोट करण्याचा इशारा दिला आहे. शिवसेनेच्या हप्तेखोरांची नावं आपण उद्याच्या कार्यक्रमात जाहीर करू, असं राणेंनी म्हटलं असून या वक्तव्यामुळे उद्याचा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडणार की उद्या पुन्हा एकदा विमानतळाच्या ठिकाणी धुमश्चक्री उडणार ? याची चर्चा सुरू झाली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केले आहे. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ सुरु होणार याचा आनंद आहे. १९९७- ९८ साली सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला. तेव्हापासून विमानतळ व्हावी, अशी माझी इच्छा होती, ती आज पूर्ण होत आहे. प्रफुल्ल पटेल यांनी ग्रीनफिल्ड विमानतळ आलं तेव्हा मंजुरी दिली होती. १५ ऑगस्ट २००९ साली या विमानतळाचे भूमिपूजन झाले. ज्यावेळी विमानतळाचे भूमिपूजन करत होतो, तेव्हा शिवसेना जमीन संपादित करू नका, विमानतळ आम्हाला नको म्हणून आंदोलन करत होती. विनायक राऊत त्यावेळी विमानतळाच्या विरोधात आंदोलन करत होते आणि आज श्रेय घ्यायला पुढे येत आहेत.

२०१४ साली विमानतळ बांधून पूर्ण केलं. पण मधल्या काळात काहीही केलं नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं. त्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. ज्यांनी विरोध केला तेच काही लोक आता श्रेय घेण्यासाठी पुढे आहेत. शिवसेना रोज तारखा जाहीर करत होती. पण यांना कोणी विचारत नव्हतं मी ज्योतिरादित्य शिंदेंकडे जाऊन सर्व परवानग्या घेतल्यात, असा टोला नारायण राणेंनी शिवसेनेला लगावला आहे. 

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सिंधुदुर्गातील उद्योजकांना प्रचंड त्रास सुरु आहे. रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम करण्यासाठी सुद्धा अडवणूक करण्यात आली. शिवसैनिकांनी आधी गाड्या घेतल्या आणि मगच रस्त्याचे काम सुरु करु दिलं. कोकणात शिवसेनेची हप्तेबाजी सुरु आहे. या हप्तेखोरांची नावं मी उद्याच्या सभेत जाहीर करणार आहे. कोकणाच्या विकासाला आड येणाऱ्या लोकांचा भांडाफोड मी उद्याच्या सभेत करणार आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!