आमच्या प्रभागात आम्ही काय केले पाहण्यापेक्षा स्वतःच्या बुडाला लागलेली आग बघा !

नाहीतर दुसऱ्याचं बघता बघता स्वतःचं कधी जळून जाईल ते केणीना कळणार पण नाही

भाजप गटनेते गणेश कुशेंचा बांधकाम सभापती मंदार केणींना टोला

कुणाल मांजरेकर

मालवण : भाजप गटनेते गणेश कुशे यांच्यावर टीका करणाऱ्या बांधकाम सभापती मंदार केणी यांना कुशेंची प्रत्युत्तर दिलं आहे. आमच्या प्रभागात आम्ही काय केले पाहण्यापेक्षा स्वतःच्या बुडाला लागलेली आग बघा, नाहीतर दुसऱ्याचं बघता बघता स्वतःचं कधी जळून जाईल ते केणीना कळणार पण नाही, असा टोला कुशेनी लगावला आहे.

मंदार केणी यांना घसरगुंडी विसरणे शक्य नाही. कारण दोन वर्षांपूर्वी याच घसरगुंडीच्या कॉन्ट्रॅक्टरकडे पैसे मगितल्याचा नगराध्यक्षांचा ऑडिओ आणि सीसीटीव्ही फुटेजने यांची झोप आम्ही उडविलेली होती. सत्तेच्या जोरावर ते प्रकरण दाबण्यामध्ये ते यशस्वी झाले. नाहीतर आज ते नगरपालिकेतही दिसले नसते. स्वतःच्या पापांचे खापर आमच्यावर फोडू नका. चुकीच्या पद्धतीने घिसाडघाई करून केवळ आर्थिक लाभ डोळ्यासमोर ठेऊन सुरू केलेली कामे तुमच्याच नाकर्तेपणामुळे थांबली आहेत. नळपाणी योजनेचे बजेट एका वर्षात २६ वरून ५२ कोटी कसं झालं याचं उत्तर आजपर्यंत आपण देऊ शकलेला नाहीत. रॉक गार्डन प्रवेशद्वार, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ही कामं सुद्धा तुमच्याच शहाणपणामुळे थांबलीत. सार्वजनिक बांधकाम विभागाने पालिकेला अनधिकृत बांधकाम करत असल्याबाबत नोटीस देणं यासारखी दुसरी नामुष्की नाही. एकाच कामावर दोन आस्थापनमधून खर्च होऊ शकतो का ?? विकास केबिनमध्ये बसून होत नाही तर मग कुठे कोळंब पुलकडे बसून होतो का ?

… मग दोन वर्षात कामगार वाढवण्याचा ठराव का नाही घेतला ?

दोन वर्षापूर्वी राजन वराडकर आणि गणेश कुशे यांनी स्थायी समितीत ठराव घातला आणि कामगार कमी केले म्हणून बोंब मारणाऱ्या मंदार केणी यांनी गेल्या दोन वर्षात तुमच्याकडे पूर्ण बहुमत असताना कामगार वाढवण्याचा ठराव का बरं घेतला नाही ? बहुमताच्या जोरावर आम्ही विरोध करूनही मंदार केणी यांनी शहरविकास आराखडा मंजुरीचा ठराव घेतला. प्रशासनाची नकारार्थी टिप्पणी स्पष्ट टिप्पणी असतानाही पाणीपुरवठा योजनेचा ठराव घेतला, मग कामगार वाढवण्याचा ठराव का बरं घेऊ शकले नाहीत ? वास्तविक कामगार कमी करण्याचा ठराव आम्ही मांडला असेल तर त्या कमिटीत नगराध्यक्षही होते. मग त्यांनी विरोध का नाही केला ? आणि कलम ३०८ नुसार तो ठराव जिल्हाधिकारी यांच्याकडे का नाही पाठवला ? तेंव्हा मंदार केणी विरोधात होते मग त्यांनी तरी तो पाठवायचा होता. त्यावेळी ते का गप्प बसले ? का तिथेही सेटलमेंट झाली होती तुमची ठेकेदाराबरोबर ? असा सवाल गणेश कुशे यांनी केला आहे.

७.४५ नंतर आमची घसरगुंडी होत नाही ; गणेश कुशेंचा टोला

आमच्या प्रभागात आम्ही काय काम केले, काय नाही हे तेथील जनता जाणते. त्यासाठी तुमच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. जनता ही सर्वश्रेष्ठ आहे ती ज्याप्रमाणे माझ्या केलेल्या कामांचं मूल्यमापन करेल तसं तुमच्याही करणार त्याची चिंता करा. परमेश्वराच्या कृपेने आणि आमच्यावर असलेल्या संस्कारामुळे आम्ही ७.४५ नंतरही स्वतः कोणाचा आधार न घेता घरी पोचतो, आमची घसरगुंडी होत नाही. आमच्या प्रभागातील जनता आमची वाट पाहत आहे पण आम्हाला मुंबईतून लोकं शोधायला येत नाहीत आणि त्यासाठी लपुन बसण्याची पाळी आमच्यावर येत नाही. वैयक्तिक टीका करून जनतेचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आम्ही मांडलेल्या मुद्द्यांवर बोला, ते खोडून काढा बघू आहे का तेवढी हिम्मत तुमच्यात ? कारण हे जनतेचे प्रश्न आहेत. आमचे वैयक्तिक नाहीत आणि वैयक्तिक टीका करायचीच असेल तरी आमच्याकडे खजिना आहे हे लक्षात ठेवा, असा इशाराही गणेश कुशे यांनी लगावला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!