मनसेच्या मालवण – कणकवली जिल्हा उपाध्यक्षपदी गणेश वाईरकर यांची नियुक्ती
तालुका उपाध्यक्षपदी पास्कोल रॉड्रिक्स ; नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन
मालवण | कुणाल मांजरेकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनसे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये मालवण – कणकवली तालुक्याच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी गणेश वाईरकर तर तालुका उपाध्यक्ष पदी देवबाग ग्रा. पं. सदस्य पास्कोल रॉड्रिक्स यांची निवड झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याची मनसे कार्यकारणी राज ठाकरे यांनी मागील वर्षी बरखास्त केली होती. त्यानंतर वर्षभर पदाधिकारी नियुक्त्या रखडल्या होत्या. अखेर मनसे नेते शिरीष सावंत, संदीप दळवी, गजानन राणे यांच्या पाठपुराव्यातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी “राजगड” मुख्य कार्यालयातून नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यात चौके येथील युवा उद्योजक प्रीतम गावडे यांच्यावर मनसेच्या तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर यापूर्वी मालवण तालुकाध्यक्ष पदी काम केलेल्या गणेश वाईरकर यांच्यावर जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर देवबाग मध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करणाऱ्या पास्कोल रॉड्रिक्स यांना तालुका उपाध्यक्ष पदाची संधी देण्यात आली आहे. या निवडीबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.