मालवण भाजपा पदाधिकाऱ्यांची अवस्था म्हणजे “नाचे मयुरी थुई थुई” !

हरी खोबरेकर यांचे टिकास्त्र ; आ. वैभव नाईकांचा जप केल्याशिवाय भाजपा पदाधिकाऱ्यांचा दिवस जात नसल्याचा श्री

शिवसेनेत असताना तिकिट वाटपात आघाडीवर असलेल्या नारायण राणेंवर स्वतःच्या मुलाच्या तिकिटासाठी धडपडण्याची वेळ

मालवण | कुणाल मांजरेकर : मालवण मधील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचा दिवस आमदार वैभव नाईक यांचा जप केल्याशिवाय जात नाही. आपल्या देवतांची पूजा करताना उठल्यानंतर त्यांना वैभव नाईक हेच दिसत असतील. वैभव नाईकांचा जप करून त्यांची अवस्था मात्र “नाचे मयुरी थुई थुई” अशी झाली आहे. कोण पालकमंत्र्यांसोबत फिरतो, कोण निलेश राणेंबरोबर फिरतो, असे हजार गट आज भाजपा मालवण मध्ये तयार झालेले दिसून येत आहेत. तरीपण “हम आपके है कौन” आणि “हम साथ साथ है” हा चित्रपट दाखवण्याचे काम याठिकाणी भाजपा कडून सातत्याने सुरु आहे. आमदार वैभव नाईक यांची मातोश्री आणि शिवसेनेवर असलेली निष्ठा सर्वसामान्य शिवसैनिकांच्या हृदयात कायम आहे. असे असताना भाजपच्या मंडळींकडून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु असून त्यामुळे शिवसैनिक आणि आमदार नाईक यांच्यातील नाते अधिक घट्ट होत आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

जनतेला अभिप्रेत असलेली विकासकामे आमदार नाईक व खासदार विनायक राऊत यांनी केलेली आहेत. यामुळे सलग दोनवेळा त्यांना जनतेने विजयाच्या रथात बसविले आहे. आमदार व खासदार यांनी कोणता विकासनिधी आणला हा प्रश्न भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला करण्यापेक्षा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्यसभा खासदार आणि केंद्रीय मंत्री म्हणून कोणता निधी आणला ?  माजी खासदार निलेश राणे यांनी खासदार म्हणून काम करताना जिल्ह्याचे कोणते प्रश्न संसदेत मांडले ? याचे उत्तर द्यावे, असे हरी खोबरेकर म्हणाले.

भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर व शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी आमदार व खासदार यांच्यावर टिका केली होती. या टिकेचा समाचार श्री. खोबरेकर यांनी शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत घेतला. यावेळी माजी नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, दिपा शिंदे, निनाक्षी शिंदे, सिद्धेश मांजरेकर, मोहन मराळ, दिपक देसाई, यशवंत गावकर, बाबु वाघ, हेमंत मोडकर पांच्यासह इतर पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पत्रकार परिषदेनंतर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदारपणे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या घोषणा दिल्या.

नारायण राणेंचे वर्चस्व कमी होतेय

केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेनेमध्ये असताना कोकणातील उमेदवार निश्चीत करताना आणि निवडून आणताना त्यांची मते आणि त्यांच्या सूचना विचारात घेतल्या जायच्या किंवा त्यांना अभिप्रेत असलेले उमेदवार दिले जात होते. मात्र आता कोकणातील त्यांचे वर्चस्व कमी झाल्याने मुलांना उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांची सुरू असलेली धडपड दुखःदायक दिसून येत आहे. मातोश्रीवर टिका करण्यासाठी राणेंच्या मुलांना भाजपमध्ये घेण्यात आलेलं आहे. त्यांनी मातोश्रीवर टिका करण्याचे बंद केल्यास भाजपमधून त्यांची हकालपट्टी निश्चीत होईल असाही उपरोधिक टोला श्री खोबरेकर यांनी मारला आहे.

दत्ता सामंत यांची आमदार होण्याची पात्रताच नाही

दत्ता सामंत यांना विधानसभा निवडणुकीत मालवण कुडाळ मतदार संघातून भाजपकडून उमेदवारी मिळणारच नाही, यामुळे त्यांनी आपण निवडणूक लढविणार नसल्याचे भाष्य बंद करावे, त्यांना मिळालेले ठेकेदारी आहे तीच त्यांनी प्रामाणिकपणे करावी. शासनाकडून घेतलेली कामे आहेत, ती योग्यप्रकारे करून जनतेचा आशिर्वाद घ्यावा. महाविकास आघाडीच्या काळात आपले नाव ब्लैकलिस्टमध्ये जावू नये यासाठी तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू भैय्या सामंत यांच्या कशाप्रकारे आपण गाठीभेटी घेत होता याची माहिती आम्हाला आहे. यामुळे आपण आमदार व खासदार यांच्यावर टिका करत बसण्यापेक्षा शासकीय निधीतून घेतलेली कामे पूर्ण करा, असा सल्ला श्री. खोबरेकर यांनी दत्ता सामंत यांना दिला.

फोटो आणि बॅनर लावून कोणी हिंदुहृदयसम्राट आहे नाही

हिंदुहृदयसम्राट म्हणून फक्त बाळासाहेब ठाकरे हे एकमेव व्यक्ती आहेत, त्यांची जागा इतर कोणीही घेऊ शकत नाही, यामुळे हिंदुहृदयसम्राट म्हणून काही जण स्वतःला म्हणवून घेत असतील आणि त्यांचे काही समर्थक त्याचा हट्ट करत असतील तर त्यासाठी त्यांनी सर्वप्रथम बाळासाहेबांच्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा अभ्यास करावा, फोटो आणि बॅनर लावून कोणी हिंदुहृदयसम्राट होत नसतो, असा टोला श्री. खोबरेकर यांनी मारला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!