कालावल मध्ये राडा : वाळू व्यावसायिक आणि ग्रामस्थ भिडले ; महिलांना धक्काबुक्की
महिलांसह ग्रामस्थांची पोलीस ठाण्यात धाव ; सुमारे २५ मद्यधुंद युवकांकडून हल्ला
अनधिकृत वाळू भरलेला डंपर जुना पास दाखवून सोडल्याचा ग्रामस्थांचा आरोप ; तलाठी कंठाळे पुन्हा संशयाच्या फेऱ्यात
कुणाल मांजरेकर
मालवण तालुक्यातील कालावल वायंगणी येथे अनधिकृत वाळू उत्खननावरून ग्रामस्थ आणि वाळू व्यवसायिक यांच्यामध्ये हाणामारी झाल्याची घटना बुधवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. जवळपास तासभर हा प्रकार सुरू होता. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर हा वाद क्षमला आहे. यावेळी वाळू व्यवसायिकांनी महिलानाही धक्काबुक्की केल्याचे समोर आले असून या घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण ग्रामस्थांनी गुरुवारी पत्रकारांना सादर केले. जवळपास २५ मद्यधुंद युवकांनी ग्रामस्थांना मारहाण करून बघून घेऊ, अशी धमकी दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याप्रकरणी आचरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, कालावल येथून चोरीची वाळू घेऊन जाणारा डंपर ग्रामस्थांनी अडवलेला डंपर पोलिसांनी ताब्यात घेऊन महसूल विभागाकडे दिला. मात्र तलाठी कंठाळे यांनी आपल्याकडील जुना पास दाखवून हा डंपर सोडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे तलाठी कंठाळे पुन्हा एकदा संशयाच्या फेऱ्यात सापडले आहेत.
मालवण तालुक्यातील कालावल येथे वाळू उत्खननाला बंदी आहे. असे असताना काही दिवसांपूर्वी याठिकाणी काही वाळू माफियांनी येऊन आम्हाला गावात अनधिकृत वाळू सुरू करायची आहे, असे सांगितले. मात्र गावातील रस्त्यांची अवस्था दयनीय असून वाळू उत्खननाला आमचा विरोध असल्याचे ग्रामस्थानी ठासून सांगितले. यावर आम्ही वाळू सुरू करणारच, हिम्मत असेल तर अडवून दाखवा, अशी भूमिका वाळू व्यावसायिकांनी घेतली. त्यामुळे ग्रामस्थांनी देखील बुधवारी रात्री अनधिकृत वाळू रोखण्याचा निर्णय घेतला. याबाबत तलाठी कंठाळे यांना माहिती देण्यासाठी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांनी फोन रिसिव्ह केला नाही.
बुधवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थ आणि महिला कालावल गडगेवाडी येथील ब्राह्मणदेव मंदिरानजीक थांबून राहिले असता रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास याठिकाणी वाळू घेऊन जाणारा डंपर (एम एच ०७ सी ६०४९) आला. या डंपर समोर एक चारचाकी गाडी होती. तसेच मोटारसायकल वरून काही युवक सोबत होते. ग्रामस्थांनी वाळू अडवल्याच्या रागातुन याठिकाणी बाचाबाची झाली. यावेळी ग्रामस्थ आणि वाळू व्यवसायिकांमध्ये जोरदार बाचाबाची आणि हाणामारीची घटना घडली आहे. जवळपास तासभर हा प्रकार सुरू होता. त्यानंतर आचरा पोलीस घटनास्थळी आल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.
तलाठी कंठाळे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात !
ग्रामस्थांनी पकडून पोलिसांकडे दिलेला वाळूचा डंपर पोलिसांनी तलाठी कंठाळे यांच्याकडे दिला. मात्र हा डंपर तलाठ्याने जुना पास दाखवून सोडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. येथील अनधिकृत वाळू उत्खननाकडे तलाठी नेहमी दुर्लक्ष करतात. आता ग्रामस्थांनी स्वतः पकडून दिलेला डंपर देखील तलाठ्याने सोडला आहे. तुम्ही माझं काय ते करून घ्या, अशी भाषा त्यांनी वापरल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी तलाठी कंठाळे यांच्यावर डंपरने हल्ला झाल्याची तक्रार त्यांनी केली होती. त्यांनतर तहसीलदारांनी त्यांना स्वतः तक्रार दाखल करण्याचे पत्र दिले. मात्र ही तक्रार दाखल करण्याचे त्यांनी स्वतः टाळले होते. त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
ग्रामस्थ, महिलांची आचरा पोलीस ठाण्यात धाव
या घटनेनंतर ग्रामस्थ आणि महिलांनी आचरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन वाळू व्यवसायिकांच्या विरोधात तक्रार दिली आहे. या वाळू व्यावसायिकांनी ग्रामस्थांना बघून घेण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी घटनेच्या वेळी केलेलं व्हिडीओ चित्रीकरण देखील पोलिसांना देण्यात आलं असून पोलीस आता कोणती कारवाई करणार, याकडे लक्ष लागून राहीले आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी देखील या घटनेचा निषेध करीत ग्रामस्थांवर हल्ला करणाऱ्या वाळू व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.