उपनगराध्यक्षांना कर्तव्याचा विसर ; पदाची शान वाढवता येत नसेल तर घालवू तरी नका
नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचा पलटवार : पदाच्या कर्तव्याचे वाचन करण्याचा सल्ला
उपनगराध्यक्ष ज्या पक्षातून निवडून येतात, त्या पक्षाच्या विरोधातच काम करण्याचा त्यांचा इतिहास
मालवण : नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांच्यातील कलगीतुरा कायम आहे. उपनगराध्यक्ष वराडकर यांनी नगराध्यक्ष कांदळगावकर यांच्यावर केलेल्या टीकेला नगराध्यक्षांनी प्रसिद्धीपत्रकातून प्रत्युत्तर दिले आहे. उपनगराध्यक्षांना आपल्या कर्तव्याचा विसर पडला असून पदाची शान वाढवता येत नसेल तर घालवू तरी नका. नगरपालिका अधिनियमातील उपनगराध्यक्ष पदाच्या कर्तव्याचे वाचन करा, असा सल्ला त्यांनी दिला आहे. उपनगराध्यक्ष राजन वराडकर ज्या पक्षातून निवडून येतात, त्याच पक्षाशी गद्दारी करतात हा त्यांचा स्वभाव असल्याची टीका नगराध्यक्षांनी केली आहे.
या पत्रकात श्री. कांदळगावकर यांनी म्हटले आहे की, उपाध्यक्ष याना आपल्या पदाच्या कर्तव्याचा विसर पडला आहे. नगराध्यक्ष पदानंतर महत्वाचे त्यांचे पद असताना न. प. मधे कुठल्यातरी पक्षाचे प्रवक्ता असल्यासारखे फक्त पत्रकार परिषद घेण्यात ते व्यस्त आहेत. त्यामुळे त्यानी ते कुठल्या पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेतात ते एकदा जाहीर करावे. कारण आजपर्यन्त ज्या पक्षातुन निवडून येतात त्यांच्या विरुद्ध काम करतात हा त्यांचा इतिहास आहे. मागच्या टर्मला राष्ट्रवादीतून निवडून येवून स्वार्थासाठी त्यांनी कॉग्रेसला मदत केली. या टर्ममध्ये शिवसेना भाजपा मधून निवडून येवून विरुद्ध काम करत आहेत . फक्त निवडून येण्यापुरता पक्षाचा उपयोग करायचा आणि निवडून आल्या नंतर स्वयंघोषित नेते असल्याप्रमाणे काम करायचे ही त्यांची वृत्ती आहे. मागील पाच वर्षात त्यानी मालवणच्या जनतेसाठी एक तरी विधायक काम केले असेल तर दाखवावे. फक्त विकासकामाला विरोध हा एकमेव कार्यक्रम त्यानी सुरु ठेवलेला आहे.
दांडी येथील लागलेल्या आगीच्या ठिकाणी स्वतः न जाता, त्यांच्यासाठी कुठलीही मदत न करता, न. प. ला या आगीबाबत कुठलीही माहिती न देता त्या ठिकाणी लागलेल्या आगीच्या मुददयाचे राजकीय भांडवल करण्याचा घृणास्पद प्रकार ते करत आहेत. या उलट आमचे नगरसेवक पंकज साधये यानी न. प. ला, मला फोन करुन या आगीची कल्पना दिली आणि १५ मिनिटात मी कर्मचारी घेऊन त्या ठिकाणी गेलो. पण स्थानिक नागरिकांनी आग बरीचशी आटोक्यात आणली होती. फायरबॉल साठी ७० ते ९० सीसी तापमान आवश्यक आहे त्याचवेळी त्याचा उपयोग होतो. त्यामुळे उपाध्यक्ष यानी याची आधी माहिती करून घ्यावी. त्या ठिकाणी गेलेल्या न. प. कर्मचारी यांचे मनोबल वाढवता येत नसेल तर किमान खच्चीकरण तरी करु नये. मालवणसाठी अद्ययावत अशा फायर फायटर गाड़ीचा प्रस्ताव अंतिम स्तरावर शासन स्तरावर मंजूरीसाठी आहे. नागरिकांची एवढी काळजी आहे असं दाखवता तर हा प्रस्ताव मंजूरी साठी आपण काय प्रयत्न केले ते पण सांगावे. विकास कामासाठी मागच्या पाच वर्षात एकदा तरी आपण मंत्रालयात गेला आहात का ते जाहिर करा, असे नगराध्यक्षांनी म्हटले आहे. मालवणच्या हिताच्या दृष्टीने सिंधुदुर्ग महाविद्यालयाने दिलेल्या जागेत अत्याधुनिक अशा स्विमिंग पूलचे काम सुरु होणार होते. याचे श्रेय आम्हाला मिळेल म्हणून BOTतत्वावर स्वखर्चाने स्विमिंग पूल बांधून देणाऱ्याला पळवून लावण्यात आले. तो कोणाच्या त्रासाला आणि कुठल्या कारणाला कंटाळून पळून गेला हे सर्वाना माहित आहे. याच ठिकाणी होणाऱ्या बैडमिंटन हॉल होण्यासाठी वराडकर आणि कुशे यानी ठराव घातला होता. पण टेंडर below गेल्यानंतर ते काम बंद पाडण्यासाठी आपण सतत कार्यरत आहात, याचे कारण समजण्या एवढी जनता हुशार आहे. पण आपल्या या स्वार्थापोटी मालवणच्या क्रीडापटूंचे नुकसान झाले आहे ही वस्तुस्थिति टाळता येणार नाही.
नगराध्यक्षांचे फटकारे
स्वतः पाणी पुरवठा सभापती असताना मालवणसाठी होणाऱ्या नवीन नळपाणी योजनेच्या ठरावाला आपले पक्षाचे सहकारी सहकार्य करत असताना आपण विरोधी मत देता, यावरून मालवणच्या जनतेची आपणाला किती काळजी आहे ते दिसून आलेले आहे, असा टोला नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी लगावला आहे. न. प. मधे शिवसेनेचे संख्याबल ६ असताना चार नगरसेवकांचा प्रवेश घेवून ते संख्याबळ आम्ही १० केले असे असताना मी शिवसेना संपवली म्हणत असाल तर आपली मनस्थिती बरी नाही, असच म्हणावे लागेल. कारण आपण आकडयात कधी चुकत नाहीत. कारण न. प. मधील आपले अंकगणितीय ज्ञान सर्वश्रुत असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.
आपले अपयश लपवण्यासाठी खावून पिवुन केलेली उपोषण मालवण वासियानी अनुभवली आहेत. नगरसेवकाच्या वैयक्तिक रागापोटी त्याच्या आईचा भाजी मार्केट मधला न.प.ची रितसर परवानगी घेवून सुरु असलेला दुकान गाळा पाडण्यासाठी आपण आपल्या पक्षाच्या पदाधिकारी याना चूकीची माहिती देवून वेठीस धरल्याचा प्रकार मालवण वासियानी बघितला आहे.
डंपिंग ग्राउंड येथील कचऱ्याची समस्या दूर करण्या साठी तेथील नागरिकांच्या मागणी नुसार 58(2)नुसार तातडीने काम करुन घेतल्यावर त्याचीही तक्रार आपण जिल्हाधिकारी यांचेकड़े केली होती, हे आपण विसरला वाटते. आजपर्यन्त आपण कचरा कामगार यांची समस्या आली तर ती सोडविण्या ऐवजी काम कस बंद पडेल, कामगार संप कसे करतील, सत्ताधारी यांच्या विरोधात प्रेसकड़े कसे जातील, यासाठीच प्रयत्न केला आहे. आपल्या राजकीय स्वार्थासाठी आपण जनतेला वेठीस धरलेले आहे. आम्ही आमची जबाबदारी टाळत नाही. पहिली तीन वर्ष स्वच्छतेचे काम पण चांगले केले आहे. परंतु, त्यानंतर आलेल्या कोविड़ महामारीत कामगारांची अडचण, कचरा गाड़ी नादुरुस्त यामुळे अडचण आली होती. पण ती दूर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. ही सर्व जबाबदारी ही नगराध्यक्ष म्हणून माझी आहे पण नगरसेवक म्हणून आपलीही आहे, हे आपण विसरला आहात.
भूयारी गटार सारखी महत्वाकांक्षी योजना होण्यासाठी त्यासाठी निधी आणून हे काम कसे पुर्ण होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत असताना ती कशी होणार नाही, कशी बंद पडेल आणि येणाऱ्या न. प. च्या निवडणुकीत त्याचा प्रचारात कसा उपयोग करता येईल यासाठी प्रयत्न करीत आहात.
विकास काम करीत असताना आपली मते मांडणे योग्यच असते. पण त्यामध्ये स्वहित न बघता जनतेच्या हिताचा विचार करणे गरजेचे असते. जसं नगराध्यक्ष यांच्या कार्याचे मूल्यमापन होऊ घातलेल्या निवडणुकीत होणार आहे, तसं आपल पण होणार आहे याच भान ठेवा. सकाळी १० ते रात्री १० पर्यन्त मित्रपरिवारासह न.प. कार्यालयात आपल्या केबिनमधे बसून शासकीय एसी चा लाभ घेता तो आता बंद करुन जनतेचे प्रश्न कसे सुटतील याकडे लक्ष दया. नाहीतर तुमच्या प्रभागातीलच लोक तुम्हाला कुचकामी ठरवतील हा सबुरीचा सल्ला, असं नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी म्हटलं आहे.