कट्टा येथील विवाहिता आत्महत्याप्रकरणी दोघांना अटकपूर्व जामीन मंजूर
संशयितांतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई व अंबरीष गावडे यांनी काम पाहिले
मालवण : कट्टा बाजारपेठ येथील विवाहितेने विषप्राशन करुन आत्महत्या केल्याबाबत दाखल गुन्हयामधील संशयीत विश्वनाथ माळवदे (वय 70), नीता नंदलाल माळवदे (वय 68 रा. कट्टा ता. मालवण) यांना ओरोस येथील मे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. याकामी संशयितांच्यावतीने ॲड. स्वरुप नारायण पई व अंबरीष गावडे यांनी काम पाहिले.
कट्टा येथील विवाहितेने कौटुंबिक वादातून 26 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी राहत्या घरात विषप्राशन केल्याने तिला गोवा बांबुळी हॉस्पिटल येथे दाखल केले असता 27 ऑक्टोबर 2023 रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानंतर मयत विवाहितेच्या आईने कौटुंबिक छळामुळेच मुलीने आत्महत्या केल्याने तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी 03 नोव्हेंबर 2023 रोजी पती समीर माळवदे, सासरा विश्वनाथ माळवदे व सासू नीता नंदलाल माळवदे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्याने मालवण पोलिसांनी भा. दं. वि. कलम 306, 498अ, 34 अन्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पतीला मालवण पोलिसांनी 04 नोव्हेंबर 2023 रोजी अटक केली. त्यामुळे सासू सासर्यांतर्फे अटकपूर्व जामीनाकरीता अर्ज दाखल करण्यात आला होता. जामीन अर्जाच्या सुनावणीअंती मे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी प्रत्येकी रक्कम रुपये 15000 चा सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला.