मोरयाचा धोंडा येथे उद्या (शनिवारी) सकाळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शासकीय महापूजा
नियोजित दालनाचे होणार सादरीकरण : उद्योगमंत्री उदय सामंत, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
मालवण : छत्रपती शिवाजी महाराजानी किल्ले सिंधुदुर्गच्या उभारणीवेळी वायरी येथील मोरयाचा धोंडा या ठिकाणी पूजन करून किल्ल्याची पायाभरणी केली होती. हा दिवस होता, २५ नोव्हेंबर १६६४. श्री गणेश, चंद्रसूर्य, शिवलिंग कोरलेल्या या खडकाची पूजा करुन व समुद्राला सुवर्ण श्रीफळ अर्पण करत महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाचा मुहूर्त केला. या ऐतिहासिक स्थानाला २०१७ साली शासकीय पूजेचा मान मिळाला आहे. या वर्षी किल्ले सिंधुदुर्गच्या पायाभरणीच्या वर्धापन दिनानिमित्त उद्या शनिवारी २५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता प्रथमच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते श्री क्षेत्र मोरयाचा धोंडा उद्या शासकीय पूजा होणार आहे. यावेळी श्री मोरयाचा धोंडा येथील नियोजित दालनाचे सादरीकरण ही होणार आहे.
यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, माजी खासदार निलेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, पर्यटन महासंघ अध्यक्ष बाबा मोंडकर, किल्ले प्रेरणोत्सव समिती अध्यक्ष गुरुनाथ राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. ढोल ताशांच्या गजरात तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषात, शिवप्रार्थनेसह हा सोहळा संपन्न होणार आहे. शिवप्रेमी नागरिकांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन विजय केनवडेकर यांनी केले आहे.