कुडाळ – मालवण मधून निलेश राणेच भाजपचे उमेदवार असतील ! 

दत्ता सामंत यांची प्रतिक्रिया ; निलेश राणेंच्या झंझावातामुळे उबाठा सेनेच्या पायाखालची वाळू सरकल्याने खोट्या बातम्या देऊन भाजपात अंतर्गत कलह निर्माण करण्याचा प्रयत्न

मालवण | कुणाल मांजरेकर

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ – मालवण मतदार संघातून निलेश राणे हेच भाजपचे उमेदवार असतील, हे आपण स्वतः अनेकदा जाहीर केले आहे. असे असताना उबाठा सेनेकडून माझ्या उमेदवारीच्या खोट्या बातम्या प्रसिद्ध करून भाजपात अंतर्गत कलह निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कुडाळ मालवण मतदार संघात निलेश राणे यांनी मागील दोन ते अडीच वर्षांपासून झंझावाती काम सुरु केले आहे. त्यामुळे येथील निष्क्रिय आमदार वैभव नाईक यांच्या पायाखालची वाळू सरकली असून खोट्या बातम्या देऊन माझ्यात आणि निलेश राणे यांच्यातील संबंध बिघडवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. मात्र अशा खोट्या बातम्यांनी संबंध खराब होण्याएवढे आमचे नाते कमकुवत नाही, जेवढ्या वेळा असे प्रयत्न कराल, तेवढे आमचे संबंध अधिक दृढ होतील, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनी दिली आहे.

कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून भाजप नेते निलेश राणे यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून देखील निलेश राणेंच्या उमेदवारीची एकमुखी मागणी करण्यात येत असून मागील दोन ते अडीच वर्ष स्वतः निलेश राणे यांनी या मतदार संघातून जोरदार तयारी सुरु केली आहे. निलेश राणे यांच्या विजयासाठी भाजपा नेते दत्ता सामंत यांनी पुढाकार घेत अलीकडील काही काळात ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश करून घेत उबाठा गटाला धक्का दिला आहे. 

या पार्श्वभूमीवर एका वेबपोर्टल वरून (कोकण मिरर नव्हे) कुडाळ मालवण मधून वैभव नाईक यांच्या विरोधात दत्ता सामंत उमेदवार असतील आणि भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब हे दत्ता सामंत यांच्यासाठी व्युहरचना आखत असल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या खोडसाळ वृत्ताचा दत्ता सामंत यांनी समाचार घेतला. निलेश राणे यांच्या झंझावातामुळे उबाठा गटाच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांच्याकडूनच अशा खोट्या बातम्या प्रसिद्ध केल्या जात असल्याचे दत्ता सामंत म्हणाले.

विशाल परब यांच्या सोबत अलीकडच्या काळात माझे कोणतेही संभाषण झालेले नाही. मी यापूर्वीच कुडाळ मालवण मतदार संघातून निलेश राणे हेच भाजपचे उमेदवार असतील अशी भूमिका जाहीर केली होती. आजही माझी तीच भूमिका आहे. निलेश राणे यांच्या उमेदवारीसाठी मतदार संघातील अन्य पदाधिकाऱ्यांबरोबरच मी देखील आग्रही आहे. पक्ष श्रेष्ठींकडून आमच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा आम्हाला विश्वास असून निलेश राणे हे या मतदार संघातून मोठ्या मताधिक्याने निवडून येण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.

मी व निलेश राणे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहोत. त्यामुळे अशा बातम्या देऊन आमच्यातील नातेसंबंध खराब होतील ही अपेक्षा करू नये, भाजपचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील त्याचा आदर ठेऊन आम्ही काम करीत राहू असे निलेश राणे म्हणाले

भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश राणे हे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख म्हणून चोखपणे काम करीत आहेत. मतदार संघातील सर्व कार्यकर्ते देखील एक दिलाने पक्षाचे काम करीत असून आमच्यात कटुता निर्माण होऊन त्याचा फायदा वैभव नाईक आणि विनायक राऊत यांना व्हावा, यासाठी उबाठा सेनेकडून खोट्या बातम्या पेरण्याचे काम सुरु आहेत. मात्र अशा कोणत्याही बातम्यांनी आमच्यात कटुता निर्माण होणार नाही. असे ते म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!