स्थानिकांना विश्वासात घेऊनच मोरयाचा धोंडा परिसराचे सुशोभीकरण व्हावे
हरी खोबरेकर यांची मागणी ; आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नामुळेच एक एकर जागा शासनाकडे हस्तांतरीत
मालवण : किल्ले सिंधुदुर्गची उभारणी करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याची पायाभरणी मोरयाचा धोंडा या पवित्र स्थळावर केली. ही बाब आम्हा वायरी आणि दांडी वासियांसाठी भूषणावह आहे. या ठिकाणी वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम होतात. ह्या परिसराचे सुशोभीकरण व्हावे यासाठी दत्तात्रय नेरकर, प्रेरणोत्सव समितीचे गुरुनाथ राणे, प्रदीप वेंगुर्लेकर यांच्या प्रयत्नांमुळे आमदार वैभव नाईक यांनी पुढाकार घेऊन हा ठिकाणची एक एकर जागा शासनाला हस्तांतरीत करून दिली. यामुळेच आज नौदलाच्या वतीने मोरयाचा धोंडा परिसराचे सुशोभीकरण होत आहे. हे काम करताना भरती आहोटीचा विचार करून स्थानिकांना विश्वासात घेत कायमस्वरूपी टिकेल, असे दर्जेदार काम करावे, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या येथील शाखेत पत्रकार परिषद झाली. यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, मंदार केणी, यतीन खोत, महेश जावकर, मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, गणेश कुडाळकर, निनाक्षी मेतर, उमेश मांजरेकर आदी उपस्थित होते. श्री. खोबरेकर म्हणाले, मोरयाचा धोंडा हे सर्वांच्या श्रद्धेचे स्थान आहे. या स्थळाचा विकास होण्यासाठी, याठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी दत्ता नेरकर, गुरु राणे, प्रदीप वेंगुर्लेकर यासारख्या अन्य मंडळींनी आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यातूनच या स्थळाला शासकीय जागा मिळून शासकीय पूजेचाही मान मिळाला. याठिकाणी तपस्वी मयेकर, सन्मेष परब यांच्या पाठपुराव्यातून रांजनाल्याचे काम झाल्याने मोरयाचा धोंडा परिसरात येणारे पाणीही अडले आहे. या स्थळाचा विकास होताना स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन वादळ, पाऊस, समुद्राची भरती ओहोटी यांचा विचार करून त्याप्रमाणे बांधकाम व्हायला हवे. आमदार नाईक यांच्या प्रयत्नातून सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिराच्या कामासाठी दीड कोटी निधी मंजूर होऊन हे काम आता पूर्णत्वास येत आहे. किल्ल्यात भूमिगत पाईपलाईनद्वारे काम आमदार नाईक यांनी मंजूर करून घेऊनही आताच्या राज्य सरकारने या कामास स्थगिती दिल्याने हे काम अपूर्ण आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावर लेझर लाईट शो होणे आवश्यक आहे. किल्ल्यातील स्वच्छतेसाठी जिल्हा नियोजन मधून वार्षिक १५ लाखाचा निधी मंजूर व्हावा अशी मागणी आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. पद्मगड, ढोपर कोपर या ऐतिहासिक स्थळांचा विकासही झाला पाहिजे, असेही खोबरेकर यांनी सांगितले.
नौदल दिनाच्या कार्यक्रमासाठी मासेमारी बंद राहणार आहे तसेच समुद्रातील जलक्रीडा बंद ठेवण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. यामुळे मच्छिमार व पर्यटन व्यवसायिकांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे या मच्छिमार व परवानाधारक जलक्रीडा व्यवसायिकांना सानुग्रह अनुदान देण्यात यावे, अशी आमची मागणी असल्याचे खोबरेकर म्हणाले.