निलेश राणेंनी राजकीय प्रवेशद्वारावर बूच मारल्याने आ. वैभव नाईक सैरभैर 

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची टीका ; भाजपा – शिवसेनेच्या माध्यमातून होणाऱ्या विकास कामाना स्वतःचे लेबल लावण्याचा आ. नाईकांचा केविलवाणा प्रयत्न 

भविष्यात अरबी समुद्रात निर्माण होणारी वादळे सुद्धा ठाकरे सेनेच्याच माध्यमातून थांबवल्याचा दावाही आ. नाईक करतील

मालवण | कुणाल मांजरेकर

आमदार वैभव नाईक यांचे राजकीय प्रवेशद्वार निलेश राणे यांनी बंद केले आहे. त्यामुळे येथील ठाकरे सेना चलबिचल झाली आहे, असा हल्लाबोल भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी केला आहे. “उठसूठ बोल झूठ… फुकाचे श्रेय लूट…” असे प्रकार ठाकरे गटाकडून सुरु आहेत. भाजपा शिवसेना युती सरकारच्या माध्यमातून होणाऱ्या सर्व विकासकामाना आपले लेबल लावण्याचा केविलवाणा प्रयत्न उबाठा कडून सुरु आहे. भविष्यात अरबी समुद्रात निर्माण होणारी वादळे सुद्धा ठाकरे सेनेच्याच माध्यमातून थांबवली. असा दावाही आमदार वैभव नाईक आणि ठाकरे कंपनीने केला तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, असा बोचरा टोला श्री. चिंदरकर यांनी लगावला.

मालवण येथील मोरयाचा धोंडा व अन्य ठिकाणी भाजपा तसेच नौसेना माध्यमातून होत असलेल्या पर्यटन विकासाचे श्रेय आमदार वैभव नाईक, खासदार यांचे असल्याचा दावा ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला होता. धोंडू चिंदरकर यांनी भाजप तालुका कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत याचा समाचार घेतला. यावेळी शहर प्रभारी विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, दीपक पाटकर, पर्यटन महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, महेश मांजरेकर, पूजा करलकर, महेश सारंग, सुधीर साळसकर, अशोक चव्हाण, निलेश खोत, अवी सामंत, विजय निकम, दीपक सुर्वे, संतोष गांवकर, प्रमोद करलकर, भाई मांजरेकर, मंदार लुडबे, राजू बिडये तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासन वतीने याठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. मालवण येथे मोरयाचा धोंडा तसेच अन्य याठिकाणी होणारी विकास कामे ही स्थानिकांना विश्वासात घेऊनच शाश्वत पद्धतीने होणार आहेत. यासाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण स्वतः आग्रही आहेत, २५ नोव्हेंबर रोजी स्वतः उपस्थित राहून शासकीय महापूजा करणार आहेत, असेही श्री. चिंदरकर यांनी स्पष्ट केले. या सोहळ्याला भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

आमदार वैभव नाईक यांनी मालवणच्या जनतेला बसस्थानक नूतनीकरणचे दाखविलेलं स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत. गेली अनेक वर्षे जनता त्याठिकाणी असुविधामुळे त्रस्त आहे. बसस्थानकाचे बांधकाम पूर्ण करू शकत नाही, आणि कोट्यावधी रूपयांची सुरू असलेली विकास कामे आपल्या पाठपुराव्यामुळे झाल्याचा दावा करत असतील तर हे हास्यास्पद म्हणावे लागेल. सध्या फक्त श्रेय घेण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. मात्र बस स्थानक तसेच अन्य सर्व विकासकामे भाजप युती सरकार माध्यमातून पूर्ण होतील.

मालवण कुडाळ मतदार संघातून भाजप नेते निलेश राणे यांना उमेदवारी मिळणार असल्याचे निश्चीत झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्याकडून सोशल मिडीयाचा वापर केला जात आहे. यातून त्यांच्या हाती काहीच लागणार नसून उलट ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या पराभवातून त्यांची जागा मतदारांनी दाखवून दिली आहे. आचरा ग्रामपंचायतीमध्ये आमदार आणि खासदार दिवसरात्र बसून असतानाही लोकांनी त्यांना नाकारले त्यामुळे यापुढेही त्यांचा पराभव निश्चित असल्याचे चिंदरकर म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!