राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जाणाऱ्या महिला क्रिकेट संघाला निलेश राणेंकडून मदतीचा हात !
प्रवासासाठी ६० हजारांची मदत सुपूर्द ; महिला क्रिकेटपटूनी मानले आभार
राणे कुटुंबाची काम करण्याची पद्धत अविस्मरणीय ; सुदेश आचरेकर यांनी केलं कौतुक
कुणाल मांजरेकर
मध्यप्रदेशमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झालेल्या कुडाळ-मालवण च्या महिला क्रिकेट संघाला प्रवासासाठी आवश्यक असलेली ६० हजारांची मदत भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी सुपूर्द केली आहे. ही रक्कम बुधवारी येथील भाजप कार्यालयात भाजप पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या संघाला सुपूर्द करण्यात आली. या महिला क्रिकेटपटूनी निलेश राणेंच्या दातृत्वाचे कौतुक करीत आभार मानले आहेत.
कुडाळ, मालवणच्या या महिला क्रिकेट संघाची मध्यप्रदेश मधील क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मात्र गरीब घरातील या महिलांना मध्यप्रदेशला जाण्यासाठी पैशाची चणचण निर्माण झाली. त्यामुळे त्यांनी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर आणि नगरसेवक दीपक पाटकर यांच्या मार्फत ही बाब अलीकडेच मालवणात आलेल्या माजी खासदार निलेश राणे यांच्यापर्यंत पोहोचवली. त्यांनी मुंबईला जाताच ही रक्कम पाठवून देण्याचे कबूल केले. त्यानुसार ही रक्कम त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडे पाठवून दिली. त्याचे वितरण बुधवारी येथील भाजपा कार्यालयात या महिला क्रिकेटपटूना करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, शहर मंडलचे प्रभारी अध्यक्ष विजय केनवडेकर, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, गटनेते गणेश कुशे, बाबा परब, आप्पा लुडबे, जगदीश गावकर, महेश मांजरेकर, चारुशीला आचरेकर, पूजा सरकारे, आबा हडकर, विलास मुणगेकर, बबन रेडकर, नंदू देसाई, मंदार लुडबे, अभय कदम, पंकज पेडणेकर, भाऊ सामंत, वैभव गिरकर, पप्पू परब, वसंत गावकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
राणे कुटुंबाची काम करण्याची पद्धत अविस्मरणीय : सुदेश आचरेकर
माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी यावेळी राणे कुटुंबीय आणि निलेश राणे यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. राणे कुटुंबीय आणि विशेषतः निलेश राणे यांची काम करण्याची पद्धत अविस्मरणीय आहे. कोकणात कोणतेही संकट आले की स्वखर्चातून मदत करण्यात राणे कुटुंबिय नेहमी पुढे असतात. चिपळूणचा पूर असो अथवा तौक्ते वादळ या दोन्ही वेळी निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात ठाण मांडून जनतेला मदतीचा हात पुढे केला. अनेकांना लाखो रुपये खर्चून मदत दिली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत कार्य करण्यात नेहमी पुढे असलेल्या मालवण येथील आपत्कालीन ग्रुपला त्यांनी अलीकडेच १५ लाखांची सुसज्ज गाडी भेट दिली आहे. ही सगळी कामे त्यांनी स्वतःच्या खिशात हात घालून केली आहेत. मध्यप्रदेशला जाणाऱ्या महिला क्रिकेट संघाला प्रवासासाठी मदतीची गरज होती. कुडाळ- मालवण मध्ये अनेक लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्याकडे या महिला गेल्या, पण त्याचा उपयोग झाला नाही. या मतदार संघाचे नेतृत्व करणाऱ्यांकडे देखील तुम्ही गेला, पण त्यांनी ५ हजार रुपये सुध्दा दिले नाहीत. मग अशा व्यक्तीला लोकप्रतिनिधी म्हणवून घेण्याचा अधिकार आहे का ? हे लोकप्रतिनिधी जनतेचा विकास करणार का ? आज निलेश राणे कुडाळ-मालवणचे नेतृत्व करीत आहेत. ज्या ज्या वेळी जनता अडचणीत असेल त्या त्यावेळी ते मदतीचा हात पुढे करतात. दीपक पाटकर आणि मी या महिला क्रिकेट संघाच्या प्रवासाचा मुद्दा उपस्थित करताच निलेश राणेंनी मुंबईत जाऊन आपण तातडीने पैसे पाठवतो, अशी ग्वाही दिली. त्यानुसार काल तब्बल ६० हजार रुपये त्यांनी पाठवून दिले आहेत. लोकप्रतिनिधी कसा असावा, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे निलेश राणे आहेत. आज राणेसाहेब केंद्रात मंत्री असून त्यांच्या मंत्रिपदाचा कोकणला निश्चितच फायदा होईल, असा विश्वास सुदेश आचरेकर यांनी व्यक्त केला.