बँकेचे सील तोडून इमारतीचा ताबा घेतल्याच्या आरोपातून एकाची निर्दोष मुक्तता
आरोपीतर्फे ॲड. स्वरूप नारायण पई यांनी काम पाहीले
मालवण : बँकेने थकीत कर्जापोटी सिल करून जप्त केलेल्या इमारतीचे बेकायदेशीरपणे सिल व कुलूप तोडून इमारतीचा वापर केल्याच्या आरोपातून राजन रामकृष्णण पावसकर (वय ५३, रा. कांदळगाव, शेमाड-राणेवाडी, ता. मालवण जि. सिंधुदुर्ग) यांची मालवण येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे ॲड.. स्वरूप नारायण पई यांनी काम पाहीले.
युनियन बँकेकडे तारण ठेवलेली काजू कारखान्याची इमारत कर्ज थकीत झाल्याने बँकेने जिल्हाधिकान्यांच्या आदेशान्वये जप्त करून त्यामधील साहीत्यासहीत इमारतीस सिल केलेले होते. आरोपीने या जप्त इमारतीची सील व कुलुपे तोडून अनाधिकारे इमारतीत प्रवेश करून त्याचा वापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यावरून शाखाधिकारी यांनी युनियन बैंक शाखा मालवण तर्फे मालवण पोलीस ठाण्यात आरोपीविरुध्द फिर्याद दाखल केली. त्यावरून १५ नोव्हेंबर २०२२ रोजी मालवण पोलीस ठाण्यामध्ये आरोपीविरूध्द भा.दं.वि. कलम ४४८, ४२७, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी तपासकाम करून मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांचे न्यायालयामध्ये आरोपीविरुध्द दोषारोपपत्र दाखल केलेले होते. याकामी सरकार पक्षातर्फे एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आले. सुनावणीअती फिर्यादीचे व साक्षीदारांचे जबाबातील विसंगती, तपासकामातील त्रुटी व आरोपीतर्फे करण्यात आलेला युक्तीवाद विचारात घेवून मालवण येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.