मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा “यांच्यामुळे” यशस्वी
भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी मानले आभार
मालवण : मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर – नारायणाचा ऐतिहासिक पालखी सोहळा नुकताच लाखो भाविकांच्या गर्दीत संपन्न झाला. हा ऐतिहासिक सोहळा कोणतेही गालबोट न लागता भक्तिमय वातावरणात झाला. गावकर मंडळींचे सुयोग्य नियोजन तसेच पोलीस, नगरपालिका प्रशासन आणि महावितरण कंपनीचे सहकार्य यांमुळेच हा पालखी सोहळा यशस्वीपणे पार पडला. मालवण शहराचा एक माजी लोकप्रतिनिधी म्हणून आपण या सर्वांचे आभार मानत असल्याची प्रतिक्रिया माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी दिली आहे.
श्री देव रामेश्वर – नारायणाचा पालखी सोहळा मंगळवारी पार पडला. दरवर्षी वाढत जाणारी गर्दी हे या पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्य आहे. यंदा देखील लाखो भाविकांनी या सोहळ्यात सहभागी होत दर्शनाचा लाभ घेतला. तमाम गावकर मंडळी, देवस्थान ट्रस्टी यांनी ह्या पालखी सोहळ्याचे अतिशय सुयोग्य नियोजन करून भाविकांना कमी वेळेत दर्शन कसे मिळेल याची काळजी घेतली. तसेच पोलीस, होमगार्ड यांनी कायदा सुव्यवस्था सांभाळत भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेतली. पालखी सोहळ्यावेळी विजेचा अखंडित पुरवठा होण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. तसेच व्यापारी, मच्छीमार बांधवानी व भाविकांनी देखील प्रशासनाला सहकार्य करीत पालखी सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यात महत्वाची भूमिका बजावली असून या सर्वांचे आपण आभार मानतो, असे दीपक पाटकर यांनी म्हटले आहे.