पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे मालवणचे नाव जागतिक पटलावर येणार

भाजपा आमदार श्रीकांत भारतीय यांचा विश्वास ; पर्यटन विकासाच्या दृष्टीने पाहणीसाठी आ. भारतीय मालवणात 

मालवण : मालवणात डिसेंबर महिन्यात राष्ट्रपती द्रौपडी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नौदल दिन साजरा होत आहे. यानिमित्त राजकोट येथे उभारण्यात येणाऱ्या शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी चोख नियोजन करण्यात येत आहे. मोदींच्या येण्याने मालवणचे नाव जगाच्या पटलावर जाणार आहे, असा विश्वास भाजपचे विधानपरिषद आमदार श्रीकांत भारतीय यांनी व्यक्त केला आहे.

भारतीय जनता पार्टी मार्फत शहराचा पर्यटनदृष्ट्या विकास होण्यासाठी शासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय यांनी शुक्रवारी मालवण येथे भेट देऊन मोरयाचा धोंडा व राजकोट येथे पाहणी केली. यावेळी भाजपा डॉक्टर सेलचे महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ. अमेय देसाई, माजी आमदार राजन तेली, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, बाबा मोंडकर, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, दिपक पाटकर, गणेश कुशे, अशोक तोडणकर, विजय केनवडेकर, महेश मांजरेकर, राजू परुळेकर, ललित चव्हाण, पंकज सादये, आबा हडकर, किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे, पर्यटन व्यावसायिक महासंघाचे मंगेश जावकर, दादा वेंगुर्लेकर, दर्शन वेंगुर्लेकर आदी उपास्थित होते.

या दौऱ्यात आमदार श्रीकांत भारतीय यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले सिंधुदुर्गची पायाभरणी ज्या ठिकाणी केली त्या मोरयाचा धोंडा या ठिकाणी पाहणी केली. त्यानंतर नौदल दिना निमित्त राजकोट किल्ला येथे नौसेनेमार्फत सुरु असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व तटबंदी उभारणी कामाची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी आमदार भारतीय म्हणाले, नौदल दिना निमित्त राजकोट येथे शिवरायांचा पुतळा उभारण्यात येत आहे. या नौदल दिन कार्यक्रमास भाजपचे सर्वोच्च नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या येणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते शिवपुतळ्याचे अनावरण होणार आहे. राजकोट याठिकाणी पुतळा उभारणीत रायगड व शिवनेरी किल्ल्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ल्यांची माती एकत्र आणून अर्पित करण्यात आली असल्याने हि जागा श्रद्धेचे मोठे केंद्र होणार आहे. हा कार्यक्रम भव्य व प्रभावी होण्यासाठी प्रशासकीय स्तरावर अंत्यत चोख व बारकाईने नियोजन सुरु आहे. पंतप्रधान व राष्ट्रपती येत असल्याने त्यांचेही दर्शन घेण्यास लोक उत्सुक असल्याने त्यादृष्टीनेही तयारी करण्यात येत आहे, असेही भारतीय म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!