मालवणच्या समुद्रात १०० हून अधिक पर्ससीन बोटींचा धुमाकूळ ; मत्स्यव्यवसाय कारवाईची हिंम्मत दाखवणार काय ?
बाबी जोगी यांनी वेधले लक्ष ; मत्स्यव्यवसाय विभागाने तातडीने कारवाई करण्याची मागणी
मालवण : मालवणचा समुद्र अनधिकृत मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय पर्ससीन बोटींना आंदण दिलाय काय ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बुधवारी सायंकाळी मालवणच्या समुद्रात १०० हून अधिक अनधिकृत पर्ससीन नौका मासेमारी साठी दाखल झाल्या आहेत. किनारपट्टी वरून या नौका सहज दृष्टीक्षेपात येत असूनही मत्स्यव्यवसाय विभागाचे येथे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. तरी मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्तीनौकेने तातडीने याठिकाणी कारवाई करावी, अशी मागणी पारंपरिक मच्छीमार नेते बाबी जोगी यांनी केली आहे.
दरवर्षी जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात परप्रांतीय पर्ससीन आणि हायस्पीड नौका धुमाकूळ घालून येथील मत्स्यसंपदा ओरबाडून नेतात. मात्र मत्स्यव्यवसाय खात्याला लागलेले हप्तेबाजीचे ग्रहण आणि या बोटींवर कारवाई करण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यांमुळे येथील समुद्रात घुसखोरी करणाऱ्या परप्रांतीय नौकांवर ठोस कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे स्थानिक मच्छिमारांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. दरम्यान, बुधवारी मालवण रॉकगार्डन नजीकच्या समुद्रात १०० हून अधिक परप्रांतीय पर्ससीन नौका निदर्शनास आल्या आहेत. किनारपट्टी वरून या नौका सहजपणे दिसत असतानाही मत्स्यव्यवसाय विभागाचे येथे दुर्लक्ष होत आहे. तरी मत्स्यव्यवसाय विभागाने तातडीने गस्तीनौका पाठवून या नौकांवर कारवाई करावी, अशी मागणी बाबी जोगी यांनी केली आहे.