सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाच्या नरकासूर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद ; “श्रीकृष्ण महिमा” संकल्पना यशस्वी

लहान गटात देऊळवाडा बॉईज ग्रुप तर मोठ्या गटात रेकोबा मित्रमंडळाचा प्रथम क्रमांक

नरकासूर स्पर्धेच्या निमित्ताने व्यसनमुक्ती, प्लास्टिक मुक्ती व महिला सुरक्षिततेचा संदेश

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण येथील युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने नरक चतुर्दशीच्या निमित्ताने सलग दुसऱ्या वर्षी भरविण्यात आलेल्या नरकासूर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरवर्षी नरकासूर स्पर्धांच्या निमित्ताने नरकासुरांचे होणारे उदात्तीकरण रोखण्यासाठी सौरभ ताम्हणकर यांच्या संकल्पनेतून नरकासुर मंडळाना “श्रीकृष्ण महिमा” देखावा सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या संकल्पनेला मंडळांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. यंदा नरकासूर प्रतिमां बरोबरच श्रीकृष्णाची वेशभूषा धारण करून श्रीकृष्ण कथा सादरीकरणाला प्राधान्य देण्यात आले. या स्पर्धेत लहान गटात देऊळवाडा बॉईज ग्रुपने तर खुल्या गटात वायरीच्या रेकोबा मित्रमंडळाने प्रथम क्रमांक पटकावला.

दिवाळीत नरक चतुर्दशी निमित्त मालवणात दरवर्षी भव्य अशा नरकासुर प्रतिकृती तयार करून त्यांचे दहन केले जाते. या पार्श्वभूमीवर भरड तारकर्ली नाक्यावर हजारो रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने शनिवारी रात्री नरकासुर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत १ फुटा पासून १५ फुटापर्यंतचे नरकासुर साकारण्यात आले होते. पर्यावरणाचं संतुलन आज काळाची गरज बनली आहे. त्यामुळे प्लास्टिक, थर्माकोलचा वापर टाळून तयार केलेले नरकासुर यावेळी पाहायला मिळाले. काही मंडळानी देखाव्यासह हालते नरकासुर तयार केले होते. या स्पर्धेला मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून लहान गटात २० तर खुल्या गटात १४ मंडळानी सहभाग घेतला. या स्पर्धेत लहान गटामध्ये प्रथम क्रमांक देऊळवाडा बॉईज या मंडळाने पटकाविला तर द्वितीय क्रमांक- महापुरुष देऊळवाडा मंडळ तर तृतीय क्रमांक – कोळंब बॉईज या मंडळाने मिळविले तसेच मोठ्या गटामध्ये १४ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता यामध्ये प्रथम क्रमांक- रेकोबा मित्रमंडळ वायरी या मंडळाने तर द्वितीय क्रमांक- ईस्वटी महापुरुष देऊळवाडा यांनी मिळविले तसेच तृतीय क्रमांक- महापुरुष रेवतळे यांनी मिळविले त्याचप्रमाणे धुरीवाडा बॉईज, राजकोट बॉईज, दांडी बॉईज यांना विशेष पारितोषिके देण्यात आली. या स्पर्धेचे सुत्रसंचालन बादल चौधरी यांनी केले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सौरभ ताम्हणकर यांच्यासह राकेश सावंत, चंद्रकांत मयेकर, तुषार वाघ, निशय पालेकर, गौरव लुडबे, प्रतीक कुबल, प्रतीक आचरेकर, प्रणव आचरेकर, फँसिस फर्नांडिस, बंड्या पराडकर, प्रशांत गवंडी, अथर्व सावजी, तन्मय पराडकर, आदित्य मोर्जे, कुणाल खानोलकर यांनी अथक परिश्रम घेतले.

यंदा नरकासुरांचे उदात्तीकरण नाही !

भगवान श्रीकृष्णाने नरकासूराचा वध केला तो दिवस नरक चतुर्दशी म्हणून साजरा केला जातो. मात्र अलीकडच्या काळात होणाऱ्या भव्य नरकासुर प्रतिमांमुळे कृष्ण महिमा दुर्लक्षित झाला आहे. त्यामुळे युवा पिढीला नरक चतुर्दशीचे महत्व समजावे या उद्देशाने सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाने या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या नरकासुरांसोबत श्रीकृष्णाची वेषभूषा असलेले पात्र सादर करण्याचे आवाहन केले होते. याला नरकासूर मंडळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यंदा बऱ्याच मंडळांकडून श्रीकृष्णाची वेशभूषा करून त्याचे देखावे सादर करण्यात आले होते. त्यामुळे सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाचा पहिलाच प्रयत्न यशस्वी झाला. पुढील वर्षी अधिक भव्य प्रमाणात ही स्पर्धा घेणार असल्याचे सौरभ ताम्हणकर यांनी सांगितले.

नरकासुर मंडळांकडून सामाजिक संदेश !

नरकासूर देखाव्यातून व्यसनमुक्ती, प्लास्टिक मुक्ती व महिला सुरक्षिततेचे संदेश असावेत असे आवाहन सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाने केले होते. याला देखील चांगला प्रतिसाद मिळाला. काही मंडळानी सामाजिक विषय अतिशय चांगल्या पद्धतीने मांडले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!