तारकर्ली समुद्रात बेपत्ता झालेल्या कागलच्या युवकाचा मृतदेह सापडला

मालवण : तारकर्ली पर्यटन केंद्रा नजिकच्या समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या आदित्य पांडुरंग पाटील (वय २१, रा. बस्तवडे, ता. कागल जि. कोल्हापूर) या पर्यटक युवकाचा मृतदेह शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास शोधकार्य करणाऱ्या स्थानिकांना सापडला आहे. कोल्हापूर येथील २० विद्यार्थ्यांचा एक ग्रुप शुक्रवारी तारकर्लीत आला असताना त्यातील काहीजण आंघोळीसाठी पाण्यात उतरले असताना दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास आदित्य हा समुद्रात बेपत्ता झाला होता. 

शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या या दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेल्या आदित्य पाटील या पर्यटकाचा स्थानिक मच्छीमार व स्कुबा डायव्हर यांच्या माध्यमातून शोध सुरू होता. शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान त्याचा मृतदेह मिळून आला. याबाबत आदित्य याच्या सहकारी यांना तसेच मालवण पोलिसांना माहिती देण्यात आली. मुरगुड येथील एका क्लासचे २० विद्यार्थी तारकर्ली एमटीडीसी येथील समुद्रावर पर्यटनाचा आनंद लुटण्यात आले. यातील काही जण अंघोळीसाठी समुद्रात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने आदित्य पाटील हा पाण्यात बुडून बेपत्ता झाला. त्याच्यासोबत असलेले अजिंक्य पाटील (वय २१) रा. कविलगे ता. कागल, जि. कोल्हापूर, प्रसाद चौगुले, रितेश वायदंडे रा. कविलगे, ता. कागल, जि. कोल्हापूर हेही बुडू लागले. हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात येताच स्थानिकांनी समुद्रात धाव घेत या तिघांना किनाऱ्यावर आणले होते. तर आदित्य याचा शोध सुरु होता. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या सोबत या शोधमोहिमेमध्ये पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांझरे, पो. कॉ. श्री पाटील आदी उपस्थित होते. तारकर्ली येथे सहायक पोलिस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सुभाष शिवगण, पो. कॉ. विश्वास पाटील, पोलीस पाटील भानुदास येरागी, बाबू ढोले, वैभव सावंत, दत्तराज चव्हाण, कपिल चव्हाण, संकेत तारी, बाबू लोणे यांसह अन्य स्थानिक शोध मोहिमेत सहभागी झाले होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!