रिलायन्स इन्शुरन्स कंपनी विरोधात भाजपा किसान मोर्चा आक्रमक
जिल्हा कृषी कार्यालयात ठिय्या आंदोलन ; शेतकऱ्यांना फळपिक विमा देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप
सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर
रिलायन्स इन्शुरन्स कंपनी कडून काही शेतकऱ्यांना फळपिक विमा देण्यास टाळाटाळ होत असल्याच्या निषेधार्थ भाजपा किसान मोर्चाच्या वतीने सोमवारी जिल्हा कृषी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या या प्रश्नाबाबत १७ नोव्हेंबर पर्यंत तोडगा न निघाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकत्रित करून विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये आंदोलन करण्यात येईल, असा इशारा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत यांनी यावेळी विमा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला.
रिलायन्स इन्शुरन्स कंपनी काही शेतकऱ्यांना फळपिक विमा देण्यास टाळाटाळ करत आहे. या विम्याचे निकष बदलण्यात येत असून याचा जाब विचारण्यासाठी कृषी आयुक्त सिंधुदुर्ग – ओरोस यांच्या कार्यालयात सोमवारी भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली किसान मोर्चा पदाधिकारी यांनी ठिय्या आंदोलन होते. विमा कंपनी विरोधातील हे आंदोलन जवळपास तीन तास चालले. यावेळी रिलायन्स इन्शुरन्स कंपनी जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी विमा कंपनीच्या वरिष्ठ अधिकऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून आंदोलनाची पार्श्वभूमी सांगण्यात आली. तसेच १७ नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फळ पिक विमा जमा झाला पाहिजे, असे जिल्हाध्यक्ष उमेश सावंत यांनी विमा कंपनीच्या वरिष्ठांना सांगितले. यावेळी जिल्हा कृषीआयुक्त यांनी शुक्रवार दि. १७ नोव्हेंबर रोजी रिलायन्स कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेवून किसान मोर्चा शिष्टमंडळाशी चर्चा करू असे सांगितल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष किशोर नरे, जिल्हा सरचिटणीस गुरुनाथ पाटील, जिल्हा चिटणीस सूर्यकांत नाईक, मालवण किसान मोर्चा मंडल अध्यक्ष महेश सारंग, कुडाळ किसान मोर्चा मंडल अध्यक्ष वैभव शेणई, वेंगुर्ला किसान मोर्चा मंडल अध्यक्ष संतोष शेटकर, परुळे येथील ज्येष्ठ शेतकरी दादा सामंत, आरती देसाई नांदगाव, मालवण मंडळातील किसान मोर्चा पदाधिकारी प्रसाद भोजने बाबू तेली, मिलिंद लोहार, प्रकाश राणे, ज्ञानदेव परब, वेंगुर्ला तुषार राय, कुडाळ- झाराप नारायण प्रभू, किशोर सडेकर, संजय डिचोलकर, बाळा साटेलकर, अजय डिचोलकर, वसंत सडेकर , वैभव साटेलकर, दिलीप सडेकर, संतोष डिचोलकर, संजय साटेलकर, प्रसाद घुमक, समीर प्रभू तसेच जिल्ह्यातील अन्य ७० ते ८० शेतकरी उपस्थित होते.