आचरा सरपंच निवडणुकीत जेरोन फर्नांडीस यांचा एक हजार पेक्षा जास्त मताधिक्याने विजय होणार !

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांचा विश्वास ; चाफेखोल मध्येही भाजपाच्या रविना घाडीगांवकर यांचा विजय निश्चित

दहा वर्षे विकास करण्यात अपयशी ठरल्याने ग्रा. पं. निवडणुकीसाठी वैभव नाईकांवर वाडीवाडीवर फिरण्याची वेळ

मालवण | कुणाल मांजरेकर

आचरा ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा – शिवसेना महायुतीचे सरपंच पदाचे उमेदवार म्हणून जेरोन फर्नांडीस हे निवडणूक लढवत असून रविवारी ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत जेरोन फर्नांडीस हे किमान एक हजाराहून अधिक मताधिक्याने विजयी होतील, तसेच सदस्य पदाचे सर्व १३ ही उमेदवार निवडून येणार असून विरोधकांना औषधाला एक सुद्धा जागा शिल्लक राहणार नाही, असा विश्वास भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी व्यक्त केला आहे. आचरा गावात विकास करण्यात ठाकरे गटाचे आमदार, खासदार अपयशी ठरले असून त्यामुळेच ग्रा. पं. निवडणुकीत आमदार वैभव नाईक यांना मतांसाठी गल्लोगल्ली फिरावे लागले आहे. मात्र विकासाची क्षमता फक्त भाजपा आणि शिवसेनेत (शिंदे गट) असून गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी येथील जनता जेरोन फर्नांडीस आणि सहका ऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिल, असे ते म्हणाले. दरम्यान, चाफेखोल मध्ये सरपंच पदासाठी निवडणूक होत असून येथे भाजपाच्या रविना घाडीगांवकर यांचा विजय निश्चित असल्याचे श्री. चिंदरकर म्हणाले.

आचरा ग्रामपंचायतीच्या प्रचाराच्या तोफा शुक्रवारी थंडावल्या. रविवारी येथे मतदान होत आहे. त्या निमित्ताने श्री. चिंदरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सरपंच पदाचे उमेदवार जेरोन फर्नांडीस, संतोष कोदे, ज्ञानदेव पाटील, राजन गावकर, मंदार सरजोशी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री. चिंदरकर म्हणाले, आचरा गावात भाजपच्या कार्यकर्त्यांची मोठी ताकद आहे. आमच्या विरोधकांनी काही मुद्दे समोर आणून भाजपा उमेदवारा विरोधात अपप्रचार सुरु केला होता. मात्र आमच्या कार्यकर्त्यांनी स्वतः वाडी वाडीत फिरून हे मुद्दे खोडून काढले आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही निवडणूक आचरा ग्रा. पं. ची असली तरी भविष्यात या गावाचा राज्य आणी केंद्र शासना कडून मोठ्या प्रमाणात निधी येणे आवश्यक आहे.

मागील दहा वर्षात आमदार वैभव नाईक आणी खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून केवळ आचरा गावातच नाही तर संपूर्ण तालुक्यात ठोस असे काम झालेले नाही. आश्वासना पलीकडे त्यांनी काहीच केलेलं नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आचऱ्याची निवडणूक भाजपा जिंकेल असे काम जेरोन फर्नांडीस यांच्या नेतृत्वाखाली येथील भाजपा कार्यकर्त्यांनी केलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आचरा गावात विकास निधी आणण्यात आला असून उर्वरित कामे देखील मार्गी लावली जातील. त्यामुळे मतदारांच्या मनात कोणत्याही प्रकारची शंका नाही.

उद्याची निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे असे समजून आमचा प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागला आहे. या निवडणुकीत विरोधकांना एकही सीट जाता नये यासाठी आमचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. माजी खासदार निलेश राणे हे विधानसभा प्रमुख म्हणून सदिच्छा भेट घेण्यासाठी काल गावात आले. भाजपा नेते दत्ता सामंत गेले आठ दहा दिवस येथे बसून आहेत. आमचे सर्व कार्यकर्ते येथे काम करत आहेत. येथील उर्वरित विकास कामे पूर्ण करण्याचा आम्ही शब्द दिला आहे. तो निश्चित पूर्ण करू.

गावाच्या हिताचा जेव्हा प्रश्न येईल तेव्हा जेरोन फर्नांडीस आणी संपूर्ण भाजपा पक्ष गावाच्या बाजूने उभा राहील. देवस्थान आणि गावातील लोक एकसंघ करून विकास करण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील. पण जेव्हा धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल तेव्हा आम्ही गावाच्या बाजूने उभे राहू, असे सांगून भाजपा शिवसेनेच्या समन्वयातून या ग्रा. पं. मध्ये १०० % यश मिळवण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मालवण मधील चाफेखोल ग्रा. पं. च्या सरपंच पदाची निवडणूक देखील होत असून याठिकाणी भाजपाच्या रविना घाडीगांवकर ह्या विजयी होतील, असा विश्वास धोंडी चिंदरकर यांनी व्यक्त केला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!