किल्ले सिंधुदुर्गवरील शिवराजेश्वर मंदिर नूतनीकरण कामाची आ. वैभव नाईकांकडून पाहणी
मालवण शासकीय विश्रामगृहाच्या कामालाही भेट ; अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना
मालवण : येथील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग मधील शिवराजेश्वर मंदिराची दुरूस्ती व नूतनीकरणाचे काम सुरु आहे. शिवराजेश्वर मंदिरात दगडात कोरलेले भव्य सिंहासन साकारण्यात आले आहे. आमदार वैभव नाईक यांनी शुक्रवारी येथे भेट देऊन कामाची पाहणी केली. त्याचबरोबर मालवण येथील शासकीय विश्रामगृहाचे देखील नूतनीकरण करण्यात येत आहे. त्या कामाची देखील पाहणी करत आ. नाईक यांनी आवश्यक सूचना केल्या.
सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे देशातील एकमेव शिवराजेश्वर मंदिर आहे. या ऐतिहासिक शिवराजेश्वर मंदिराच्या दुरूस्ती व नूतनीकरणाच्या कामासाठी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात १ कोटी ५२ लाख रु. निधी मंजूर करण्यात आला होता. तसेच शिवराजेश्वर मंदिरातील सिंहासनासाठी आमदार वैभव नाईक यांच्या आमदार फंडातून १५ लाख रु मंजूर करण्यात आले आहेत. दगडात कोरलेल्या भव्य सिंहासनाचे काम कोल्हापूर येथील तज्ञ कारागीर अशोक सुतार आणि सहकारी यांनी केले आहे. त्यांनी अनेक ऐतिहासिक कामे केली असून कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिरातील नवीन मूर्ती देखील त्यांनीच साकारली आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गट मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, शहरप्रमुख बाबी जोगी, वायरी भूतनाथ सरपंच भगवान लुडबे, किल्ले प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत, स्वप्नील आचरेकर आदी उपस्थित होते.