मालवण किनारपट्टीवरील “त्या” बांधकामांना तात्पुरता दिलासा ; निलेश राणेंची यशस्वी मध्यस्थी !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मालवण दौऱ्यानंतर “त्या” बांधकामांचे फेरसर्वेक्षण होणार ; तोपर्यंत कारवाई नाही
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण शहराच्या किनारपट्टी वरील ६६ बांधकामांवर कारवाई करण्याची मोहीम बंदर विभागाने हाती घेतली आहे. त्यामुळे संबंधित मत्स्य आणि पर्यटन व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. या व्यावसायिकांना भाजपा नेते निलेश राणे यांच्या मध्यस्थीने मोठा दिलासा मिळाला आहे. महसूल विभागाने बजावलेल्या अनेक नोटीसांमध्ये त्रुटी असून या बांधकामांचे फेर सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. त्यासाठी निलेश राणे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि प्रशासना सोबत सकारात्मक चर्चा केली असून डिसेंबर मधील पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर हे फेरसर्व्हेक्षण केले जाणार आहे. तोपर्यंत सदरील कारवाई स्थगित ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब यांनी दिली आहे.
मालवण किनारपट्टी भागातील काही बांधकामे अनधिकृत ठरवून तोडण्याच्या नोटीसा आल्यानंतर स्थानिक मच्छिमार आणि पर्यटन व्यवसायिक हवालदिल झाले होते. अनेक वर्षे असलेल्या आपल्या बांधकामांवर कारवाई होणार त्यामुळे भीतीग्रस्त झालेल्या बांधकाम धारक स्थानिकांनी भाजप कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे तसेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधले होते. आम्ही अनेकवर्षे याठिकाणी राहत आहोत. याबाबत कागदपत्रेही आमच्याकडे आहेत. प्रशासन आम्हाला अनधिकृत ठरवत असेल तर ती जागेचा सर्व्हे करून प्रशासनाने खात्री करावी. आम्ही अनधिकृत जागेत नाहीत हे सिद्ध होईल. तरी आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी केली होती. याबाबत प्रशासनालाही निवेदने देण्यात आली होती. या सर्व बाबींचा विचार करता त्याला पालकमंत्री तसेच निलेश राणे यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवत प्रशासन स्तरावर माहिती घेऊन पुढील भूमिका घेतली जाईल असे सांगितले होते. त्यानुसार सदर बांधकामे यांचे फेरसर्वेक्षण होणार असल्याचे प्रशासन स्तरावर निश्चित झाले आहे, अशी माहिती बाबा परब यांनी दिली आहे. ही कारवाई थांबवण्यासाठी बाबा परब आणि स्थानिक नगरसेवक पंकज सादये यांनी प्रयत्न केले.