मालवण बंदर जेटीवर शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करणार
कुणाल मांजरेकर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला आदेश ; नूतन बंदर जेटीचे नोव्हेंबर मध्ये उदघाटन
मालवण : आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून मालवण येथे सुसज्ज बंदर जेटी उभारण्यात आली आहे. या बंदर जेटीचे ३० नोव्हेंबर पर्यंत उदघाटन करून ही जेटी पर्यटकांना खुली करण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार याठिकाणी शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना मेरिटाईम बोर्डाला देण्यात आल्या आहेत.
मुंबई येथे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या दालनामध्ये कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक व महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी , एमिशनरी ऑफिसर श्री. बडये यांची मंगळवारी बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून उभारण्यात आलेल्या मालवण येथील नवीन जेटीचे उदघाटन ३० नोव्हेंबर पर्यंत करून पर्यटकांसाठी जेटी खुली करण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मालवण जेटी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याच्या सूचना मेरिटाईम बोर्ड ला देण्यात आल्या. याबाबत प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून लवकरात लवकर याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करेल असा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा उभारण्यात येईल असे अमित सैनी यांनी स्पष्ट केले.