कर्जबाजारीपणाला कंटाळून डिकवल बौद्धवाडी येथे एकाची आत्महत्या

ठासणीच्या बंदूकीने गोळी झाडून घेतली ; घटनेमुळे गावात खळबळ

मालवण : कर्जबाजारीपणाला कंटाळून सचिन सहदेव डिकवलकर (वय- ३८, रा. डिकवल बौद्धवाडी) यांनी ठासणीच्या बंदुकीने गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान घडली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची फिर्याद त्यांच्या भावाने पोलीस ठाण्यात दिली असून पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन डिकवलकर हे मुंबई येथे पत्नी व मोठ्या मुलासह वास्तव्यास होते. त्यांचा लहान मुलगा डिकवल येथे मूळ घरी राहत होता. ते मुंबईहून आपल्या लहान मुलाला नेण्यासाठी काही दिवसांपूर्वी डिकवल येथे आले होते. कर्जबाजारी झाल्याने त्यांच्यात नैराश्य आले होते. त्यांच्या मेहुणीने त्यांच्यासाठी व बायकोसाठी मुंबई येथे काम पाहिले होते. काल रात्री सचिन यांनी मेहुणीला फोन करत कर्जबाजारी झाल्याने मी जीवाचे बरेवाईट करून घेणार असून तुला काही वेळात त्याची माहिती मिळेल असे सांगितले. यात तत्काळ त्यांच्या मेहुणीने नातेवाईकांना माहिती देत घरी जाण्यास सांगितले. रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान सचिन यांची आई व मुलगा घरात टीव्ही बघत होते तर वहिनी जेवण बनवीत असताना सचिन यांनी अंगणात ठासणीच्या बंदुकीच्या चापास नायलॉन दोरी बांधून ती पायाच्या अंगठ्यास अडकवली व बंदूक जबड्यास लावत गोळी झाडून घेतली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अचानक मोठा आवाज झाल्याने घरातील मंडळींनी बाहेर धाव घेतली असता सचिन हे खाली पडलेले दिसून आले. या प्रकाराची माहिती गावातील लोकांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सहायक पोलिस निरीक्षक सुनील जाधव, कट्टा पोलीस दुरक्षेत्राचे प्रकाश मोरे, सिद्धू चिपकर यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुनील जाधव करत आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!