राजकोट मध्ये शिवपुतळा उभारणीचे काम युद्धपातळीवर
भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणेंनी घेतला आढावा
मालवण | कुणाल मांजरेकर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ४ डिसेंबर रोजी होणाऱ्या नौदल दिनानिमित्त मालवण शहरातील राजकोट येथे भव्य असा शिवपुतळा उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या कामाची भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी शनिवारी पाहणी केली. हे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकारी आणि ठेकेदारा सोबत यावेळी चर्चा करण्यात आली.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक गणेश कुशे, आप्पा लुडबे, दामोदर तोडणकर, अवी सामंत, आबा हडकर यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
नौदल दिनानिमित्त पंतप्रधान आणि राष्ट्रपती ४ डिसेंबर रोजी मालवण मध्ये येत आहेत. या कार्यक्रमाचे औचित्य साधून राजकोट किल्ल्यावर शिवपुतळा उभारला जात असून येत्या १ नोव्हेंबर रोजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपा नेते निलेश राणे याठिकाणी पाहणी करणार आहेत. या कामाचा आढावा घेण्यासाठी निलेश राणे यांनी येथे भेट देऊन पाहणी केली.