मच्छिमार आणि पर्यटन व्यवसायिकांच्या संघर्षात शिवसेना ठाकरे गट स्थानिक भूमिपुत्रांच्या पाठीशी !

स्थानिक भूमिपुत्रांवरील अन्यायाच्या विरोधात शासनाला सळो की पळो करून सोडणार ; हरी खोबरेकर यांचा इशारा

आचरा ग्रा. पं. निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय निश्चीत ; मंगेश टेमकर यांसह सर्व उमेदवार बहुमताने विजयी होणार

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण किनारपट्टीवर मच्छीमार आणि स्थानिक भूमिपुत्रानी पर्यटन क्षेत्रात उतरून आपला रोजगार उभा केलेला आहे. किनारपट्टीवरच ज्यांचे आयुष्य गेले त्यांचा रोजगारही किनारपट्टीवर असणार आहे. तात्पुरत्या स्वरूपातील त्यांच्या झोपड्यांना शासनाने खरे तर संरक्षण देणे आवश्यक आहे. मात्र शासन यंत्रणा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचे निमित्त करून मच्छीमारांना किनारपट्टीवरून कायमस्वरूपी हटविण्याचे काम करत आहेत. यामुळे मच्छीमार आणि पर्यटन व्यावसायिकांनी जाहीर केलेल्या संघर्षात उद्भव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सक्रीयपणे सहभागी होणार आहे. स्थानिक भुमीपुत्रांवरील अन्यायाच्या विरोधात आम्ही शासनाला सळो की पळो करून सोडू असा इशाराही शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी मालवण मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.

शिवसेना तालुका कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. खोबरेकर बोलत होते. यावेळी उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, यतीन खोत, नरेश हुले, युवासेनेचे सिद्धेश मांजरेकर, दिपक देसाई, अक्षय रेवंडकर, अक्षय भोसले, महेश जावकर आदी उपस्थित होते.

मच्छीमार समाज बांधवांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी पिढीजात बांधलेल्या झोपड्या आज तोडण्याचे आदेश शासकीय यंत्रणांना कोणी दिले ? हे सर्वप्रथम जाहीर झाले पाहिजे. आम्ही आजपर्यंत मच्छीमार बांधवांच्या आणि पर्यटन व्यावसायिकांच्या पाठिशी राहून त्यांना संरक्षण देण्याचे काम केले आहे. कोणाच्या पोटावर मारून कोणाला आनंद मिळत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. कोणत्याही संघर्षामध्ये आम्ही पुढाकार घेऊ मच्छीमार बांधव आणि पर्यटन व्यावसायिक ज्या ज्यावेळी आम्हाला साद देतील त्या त्यावेळी आम्ही पुढे उभे असू असेही श्री. खोबरेकर म्हणाले आहेत.

आचरा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय निश्चीत

आचरा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत आम्ही लोकांच्या मनातील उमेदवार असलेल्या मंगेश टेमकर यांना सरपंच पदाची उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीच्यावतीने आम्ही या निवडणुकीत उतरलेलो आहे. सर्व पक्ष एकत्रिपणे लढत आहेत. शिवसैनिक एकदिलाने आणि एकविचाराने संपूर्ण पॅनेलच्या विजयासाठी सज्ज झालेले आहेत. टेमकर यांनी आजपर्यंत गावात खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात विकासकामे केलेली आहेत, यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीचे पॅनेल विजयी होणार आहे, असाही विश्वास श्री. खोबरेकर यांनी सांगितले.

सध्या सर्वत्र आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजले आहेत. मालवण ग्रामीण रूग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात अगर गोवा बांबुळी याठिकाणी पाठविण्यात येत आहे. एकही कायम अधिकारी याठिकाणी कार्यरत असलेला दिसून येत नाही. आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून याठिकाणी प्रशस्त असे ऑपरेशन थिएटर उभारण्यात आलेले असताना त्याठिकाणी एकही शस्त्रक्रिया अगर महिलांची प्रसुती केली जात नाही, यामुळे सध्या रूग्णालय व्यवस्थेचे दुर्दक्षा झालेली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या कालावधीत रुग्णांना आवश्यक असणाऱ्या सुविधा आणि औषधांचा पुरवठा केलेला होता. आतातर औषधेही मिळताना कठिण झालेले आहे. शिक्षण व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत, प्राथमिक शाळा धनदांडग्यांच्या ताब्यात देण्यासाठी शिक्षणमंत्री प्रयत्नशिल आहेत, तर अनेक शाळा बंद करण्याच्याही प्रयत्नात असल्याचे ते दिसून येत आहे. यामुळे सध्याचे सरकार हे सर्वसामान्यांच्या मनातून उतरलेले आहे. यामुळे पुन्हा एकदा ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सत्ता येण्यासाठी शिवसैनिक सज्ज झालेला आहे. खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक तिसऱ्यांदा विजयी होण्यासाठी सज्ज आहेत, असेही श्री. खोबरेकर म्हणाले.

यंदाचा दसरा मेळावा न भुतो न भविष्यती

यावर्षीच्या शिवतिर्थावरील ठाकरे शिवसेनेचा दसरा मेळावा हा न भुतो न भविष्यती असाच झालेला आहे. यामुळे शिवसैनिकांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झालेले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरविण्याचे आदेश या मेळाव्यातून दिलेला असल्याने शिवसैनिक यामुळे आता न्याय प्रश्नांसाठी संघर्ष करण्यासाठी सज्ज झालेला आहे. प्रशासकीय यंत्रणांतील जे अधिकारी जनतेच्या प्रश्नांसाठी काम करणार त्यांना सहकार्य करणे आणि जे अधिकारी मुजोरगिरी करतील आणि जनतेला वेठीस धरतील त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येणार आहे. मालवण तालुक्यातील सर्व शिवसैनिक आक्रमकपणे आता लढण्यासाठी सज्ज झालेला आहे, असेही श्री. खोबरेकर यांनी स्पष्ट केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!