… अन्यथा समुद्रात उपोषण अन् प्रसंगी कुटुंबा समवेत आत्मदहन करणार !

मालवण किनारपट्टीवरील “त्या” अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी पर्यटन व्यावसायिक दामोदर तोडणकर आक्रमक

आपल्या घराचे बांधकाम जेसीबी लावून तोडताना तीन झाडे अनधिकृतपणे तोडली ; जेसीबी मालकासह अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी पाठपुरावा करणार

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण किनारपट्टी वरील शासकीय जागेतील ६१ बांधकामे येत्या ७ दिवसात हटवण्याची नोटीस प्रशासनाने संबंधितांना दिली आहे. माझे बांधकाम अनधिकृत ठरवून २४ तासाच्या नोटीसीवर ते पाडण्यात आले. त्याप्रमाणे इतर सर्व बांधकामे देखील पाडण्यात यावीत. ही कारवाई निर्धारित वेळेत न झाल्यास मालवणच्या समुद्रात जाऊन उपोषण करणार असून यानंतर देखील ही कारवाई न झाल्यास पत्नी व मुलासह बंदर विभागाच्या कार्यालया समोर आत्मदहन करण्याचा गंभीर इशारा पर्यटन व्यवसयिक दामोदर तोडणकर यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. याबाबत पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार, बंदर अधिकारी यांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दामोदर तोडणकर हे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांची पत्नी दिव्या तोडणकर, मुलगा ओम तोडणकर उपस्थित होते. बंदर विभागाने सुडभावनेतून माझे राहते घर तोडलेले आहे. यामुळे आपण न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून न्यायालयीन लढाई सुरूच ठेवणार आहे. न्यायप्रविष्ठ बाब असताना जेसीबीच्या सहाय्याने माझे बांधकाम तोडण्यासाठी ज्या ज्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे, त्यांच्यावरही कारवाई करण्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहे. तसेच बंदर विभागातील एका अधिकाऱ्याच्या कुटुंबियांनी केलेले अनधिकृत बांधकाम अद्याप पाडण्यात आलेले नाही, आपल्या कुटुंबियांना वाचवून इतरांचे बांधकाम तोडण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या अधिकाऱ्याला नोकरीत राहण्याचा हक्क नाही, यामुळे याबाबतही आपण शासनाचे लक्ष वेधणार आहे, असेही तोडणकर यांनी सांगितले.

शासकीय जागेमध्ये उभारण्यात आलेल्या ६१ बांधकामांची यादी शासनाने तयार केलेली आहे. यामुळे या बांधकामांवर कारवाई करण्याची धमक प्रशासनाने दाखविली पाहिजे, माझे बांधकाम तोडण्यासाठी ज्या पद्धतीने तातडीने कार्यवाही करण्यात आलेली होती, त्याप्रमाणे इतरांचेही बांधकाम तोडण्यासाठी अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करावी. मी मच्छीमार आणि गाबित कुटुंबातील असतानाही माझे बांधकाम तोडण्यात येत असताना माझ्या पाठिशी कोणीही उभे राहिले नाही, मला एकटा पाडण्यात आलेले होते. यामुळे आता मी माझी लढाई लढणार आहे. माझ्यावर झालेल्या कारवाईप्रमाणेच इतरांचीही बांधकामे हटविण्यात येणे आवश्यक आहे. तरच शासन यंत्रणा पारदर्शकपणे काम करत असल्याचे दिसून येईल, अन्यथा फक्त माझ्यासाठीही कारवाई होती काय? असा सवाल निर्माण होत आहे, असेही तोडणकर म्हणाले.

झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश शासन देते. मात्र मी गेली चाळीस वर्षे तीन झाडे जगविली होती. ती झाडे बांधकाम तोडताना वाचविता येणे शक्य असतानाही झाडेही जमीनदोस्त करण्यात आलेली आहेत. सदरची झाडे तोडण्यासाठी नगरपालिकेच्या वृक्ष समितीची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती. यामुळे झाडे तोडण्याचे आदेश देणाऱ्या बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांवर आणि जेसीबीच्या मालकावर गुन्हे दाखल करण्यासाठी आपण नगरपालिका प्रशासन आणि वनविभागाकडे मागणी करणार आहोत. झाडे तोडताना त्याठिकाणी असलेले समुद्रकिनाऱ्याची धूप रोखण्यासाठी असलेल्या कांदळवन वृक्षामध्ये मोडणारे एक झाडही जमीनदोस्त करण्यात आलेले आहे, यामुळे त्यादृष्टीने कांदळवन विभागाचेही यात लक्ष वेधण्यात येणार असल्याचेही श्री. तोडणकर यांनी सांगितले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!