उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर निलेश राणेंची नाराजी दूर…
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती ; फडणवीस – चव्हाण – राणेंमध्ये सागर बंगल्यावर चर्चा
सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर
भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांची मध्यस्थी दूर करण्यात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना यश आले आहे. ना. चव्हाण यांनी आज सकाळी निलेश राणेंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. यानंतर या दोघांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर निलेश राणे यांची नाराजी दूर झाल्याची माहिती पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. छोट्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याने या रागातून निलेश राणे यांनी निवृत्तीचे अस्त्र उगारले होते. त्यांची ही भूमिका योग्यच होती. यापूढे असे प्रकार होणार नाहीत, वरिष्ठ पातळी वरून छोट्या कार्यकर्त्यांची विशेष काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही आम्ही त्यांना दिल्याचे ना. चव्हाण यांनी सांगितले.
भाजप नेते निलेश राणे यांनी काल राजकारणातून निवृत्त होत असल्याचं जाहीर केल्यानंतर आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी निलेश राणे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मंत्री रविंद्र चव्हाण यांनी निलेश राणे यांच्यामध्ये तब्बल ३ तास चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गेले.
सिंधुदुर्गसह कोकणातील सर्व निवडणुका यापुढे निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली !
कोणताही चांगला कार्यकर्ता पक्षाच्या कामातून बाहेर जाणे हे पक्षाला देखील परवडणारे नाही. म्हणूनच मी स्वतः निलेश राणे यांना भेटून आग्रह केला. यापुढील काळात निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्गासह कोकणातील सर्व निवडणुकांमध्ये भाजपचा झंझावात कायम राहील, असा विश्वास ना. रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
देवेंद्र फडणवीस, रविंद्र चव्हाण आणि निलेश राणे यांच्यामध्ये तब्बल दिड तास चर्चा झाली. यावेळी नेत्यांनी निलेश राणे यांच्या अडचणी आणि नाराजीचे कारण जाणून घेतले, त्याच्यांशी चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ना. रविंद्र चव्हाण यांनी निलेश राणे यापुढे देखील राजकारणात असणार आहेत असं सांगितलं आहे. काल निलेश राणे यांनी मी राजकारणातून बाजूला जात असल्याची घोषणा केली होती. राणे यांच्या या निर्णयानंतर राज्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर आज निलेश राणे यांची ना. रवींद्र चव्हाण यांनी भेट घेतली आणि त्यांची मनधरणी केली. यानंतर निलेश राणे यांना घेऊन रवींद्र चव्हाण थेट देवेंद्र फडणवीसांकडे पोहोचले. तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. त्यानंतर निलेश राणे यांची मनधरणी करण्यात भाजप नेत्यांना यश आले आहे. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, निलेश राणे यांनी ट्विट केल्यानंतर नेमकं काय घडलं हे कळत नव्हतं. आम्ही याबाबत निलेश राणे यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील चर्चा केली. संघटनेत काम करत असताना कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये ही निलेश राणे यांची भावना होती. छोट्या कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घ्यायला हव्यात, असं त्याचं म्हणणं होतं. याबाबत आम्ही चर्चा केली. निलेश राणे यांनी रागावून निर्णय घेतला होता. आता मी स्वतः या विषयात लक्ष घालणार आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांची कामे केली जातील. मी आग्रह केला असा निर्णय घेऊ नका. ज्याब्अडचणी आहेत त्या समजून घेऊ. आम्ही सर्वजण पक्षासाठी काम करत आहोत. लोकसभा विधानसभा निवडणुका लढत असताना कार्यकर्त्यांना कोणतीही अडचण येऊ नये याची खबरदारी घेतली जाणार आहे, इथून पुढे देखील निलेश राणे राजकारणात असतील” असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे.