मालवण बंदर जेटीवरील “ते” बांधकाम प्रशासनाने हटवले ; मोठ्या पोलीस फौजफाट्याने तणाव

कारवाई बेकायदेशीर ; सनदशीर मार्गाने लढा उभारणार : दामोदर तोडणकर यांची प्रतिक्रिया

मालवण किनारपट्टीवरील अन्य अनधिकृत बांधकामांवरही कारवाई करावी, अन्यथा समुद्रात उपोषण करणार : तोडणकर यांचा इशारा

मालवण | कुणाल मांजरेकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या नौदल दिनाच्या पार्श्वभूमीवर मालवण बंदर जेटीवरील सर्व अतिक्रमणे हटविण्याची मोहीम बंदर विभागाने हाती घेतली आहे. बुधवारी बंदर जेटी परिसरात असलेले दामोदर तोडणकर यांचे बांधकाम अनधिकृत ठरवत बंदर विभागाकडून पोलीस बंदोबस्तात जेसीबीद्वारे जमीनदोस्त करण्यात आले. बंदर विभागाच्या जागेत अनधिकृतपणे जलक्रीडा व्यवसायाचा स्टॉल उभारून अतिक्रमण केल्याप्रकरणी बंदर विभागाने तोडणकर यांना वारंवार नोटीसा बजावल्या होत्या. याबाबत बंदर विभाग व तोडणकर यांच्यात न्यायालयीन लढा देखील सुरु होता. मात्र हे अतिक्रमण हटविण्यासाठी २४ तासांची नोटीस बजावत या मुदतीत अतिक्रमण न हटविल्याने कारवाईचा बडगा उगारत बंदर विभागाने हे अतिक्रमण हटविले. दरम्यान, या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालय तसेच सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात दावा सुरु आहे. असे असताना बंदर विभागाने मनमानी करत आणि न्यायालयाचा अनादर करीत आजची कारवाई केली असून या विरोधात सनदशीर मार्गाने न्यायालयीन लढाई लढणार असल्याची प्रतिक्रिया दामोदर तोडणकर यांनी दिली आहे. मालवण किनारपट्टीवरील ५० हून अधिक बांधकामे अनधिकृत ठरवण्यात आली आहेत. माझ्या बांधकामावर ज्याप्रमाणे कारवाई केली, त्याप्रमाणे इतरही बांधकामांवर कारवाई न झाल्यास समुद्रात उपोषण करण्याचा इशारा दामोदर तोडणकर यांनी दिला आहे.

मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यात ४ डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा होणार असून या पार्श्वभूमीवर मालवण बंदर जेटी परिसरात सुशोभीकरण तसेच सुरक्षेच्या दृष्टीने बंदर विभागाने गेल्या काही दिवसांपासून बंदर जेटी परिसर व बंदर विभागाच्या वाहनतळावरील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई सुरु केली. या पार्श्वभूमीवर बंदर विभाग कार्यालयाच्या नजिक बंदर विभागाच्या जागेत दामोदर तोडणकर यांनी जलक्रीडा व्यवसायाच्या बुकिंगसाठी उभारलेली शेड हटविण्यासाठी बंदर विभागाकडून तोडणकर यांना गेली काही वर्षे नोटीसा बजावण्यात येत होत्या. याबाबत न्यायालयात कायदेशीर लढाही सुरु होता. मात्र नौदल दिनाच्या निमित्ताने बंदर विभागाने आज हे अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. हे अतिक्रमण हटविण्यापूर्वी बंदर विभागाकडून काल दामोदर तोडणकर यांना कायदेशीर नोटीस बजावून २४ तासाच्या आत स्व:खर्चाने अतिक्रमण हटवावे, अन्यथा अतिक्रमण हटाव योजने अंतर्गत हे अतिक्रमण हटविण्यात येईल असा इशारा दिला होता. मात्र २४ तासात तोडणकर यांच्याकडून अतिक्रमण हटविले न गेल्याने आज सकाळी १० वाजता बंदर विभागाचे अधिकारी पोलीस व दंगा काबू पथकाच्या फौजफाट्यासह अतिक्रमणाच्या ठिकाणी हजर झाले. पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साहाय्याने व नगरपालिका सफाई कर्मचारी यांच्या सहकार्याने हे अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली.

बंदर विभागाच्या “त्या” हप्तेखोर अधिकाऱ्यावर कारवाई करा

दामोदर तोडणकर यांनी बंदर विभागाच्या एका अधिकाऱ्याच्या कारभारा बाबत गंभीर आरोप केला आहे. या अधिकाऱ्याने माझ्याकडे पैशाची मागणी केली होती. पण मी नकार दिल्याने माझे राहते घर आज पाडण्यात आले आहे. संबंधित अधिकारी याने अनधिकृत वाळूच्या रॅम्पवर कारवाई न करण्यासाठी आजवर सुमारे ५ लाखांहून अधिक रक्कम उकळली आहे. आम्ही रिपोर्ट दिल्याशिवाय महसूल विभाग तुमच्यावर कारवाई करू शकत नाही, असे त्याने वाळू व्यवसायिकांना सांगितले आहे. या अधिकाऱ्याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी दामोदर तोडणकर यांनी केली आहे.

यावेळी प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संदीप भुजबळ, बंदर विभागाचे उपअभियंता श्री. पेटकर, शाखा अभियंता पारेश शिंदे, बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर, सहाय्यक बंदर अधिकारी अनंत गोसावी, अरविंद परदेशी, चौकीदार साहेबराव कदम, शंकर नार्वेकर यांच्यासह पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे व पोलीस अधिकारी व कर्मचारी, नगरपालिका अधिकारी, वीज वितरणचे अधिकारी, तलाठी आदी उपस्थित होते. दुपारी १ वाजेपर्यंत ही कारवाई सुरु होती.

बंदर विभागाची कारवाई चुकीच्या पद्धतीने : दामोदर तोडणकर

बंदर विभागाच्या कारवाई बाबत पर्यटन व्यावसायिक दामोदर तोडणकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या जमिनी बाबत न्यायालयात कायदेशीर लढाई सुरु होती. या बांधकामाला नगरपालिकेने घर नंबर दिलेला आहे. तसेच वीज वितरण कंपनीने याठिकाणी व्यवसायिक व घरगुती मीटर दिलेला आहे. जिल्हा न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयात हे प्रकरण प्रलंबीत असून अद्याप याप्रकरणी न्यायालयाने अंतिम निकाल दिलेला नाही. असे असताना ही कारवाई करून न्यायालयाचा अनादर केला असून या विरोधात आपण न्यायालयीन लढा देणार आहोत. याबाबत सुप्रीम कोर्टात देखील दाद मागणार असल्याचा इशारा दामोदर तोडणकर यांनी दिला आहे. मालवण किनारपट्टी वरील अन्य ५० हून अधिक बांधकामांना अनधिकृत ठरवले गेले आहे. या सर्व बांधकामांवर देखील अशीच कारवाई करावी, अन्यथा आपण समुद्रात उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!