मालवणात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आठवणींना उजाळा !
“सागरा प्राण तळमळला” नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसाद ; ना. उदय सामंत यांच्या संकल्पनेतून शिवसेनेच्या वतीने आयोजन
वेंगुर्लेतील डॉ. मधुसूदन कालेलकर सभागृहात आज तर कुडाळ मधील बाबा वर्दम थिएटर मध्ये उद्या नाट्यप्रयोग
मालवण | कुणाल मांजरेकर
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी स्वतःच्या संसाराची आहुती देऊन सर्वस्व अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे इतिहासात काहीसे दुर्लक्षित राहिलेले व्यक्तिमत्व. या व्यक्तिमत्वाच्या स्वातंत्र्य लढया तील आठवणींना उजाळा देण्याच्या उद्देशाने शिवसेनेच्या वतीने राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून “सागरा प्राण तळमळला” हे नाटक शनिवारी मालवणच्या मामा वरेरकर नाट्यगृहात सादर करण्यात आले. या नाटकाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या नाटकाच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याला उजाळा मिळाला. “भारत माता की जय” असा जयघोषाने नाट्यगृह दुमदुमून गेले.
आताच्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवन प्रवासाची महती कळावी, या उद्देशाने शिवसेनेच्या वतीने मालवण, वेंगुर्ला आणि कुडाळात श्री श्री बालाजी निर्मित “सागरा प्राण तळमळला” ह्या नाटकाचे मोफत प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत. याचा शुभारंभ मालवणात झाला. मालवण मधील मामा वरेरकर नाट्यगृहात शनिवारी सायंकाळी या नाटकाचा प्रयोग संपन्न झाला. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्याहस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. यावेळी शिवसेनेचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख राजा गावकर, तालुकाप्रमुख महेश राणे, हरेश पाटील, अल्पेश निकम, नीलम शिंदे, गीतांजली लाड, भारती घारकर, दीपक मिठबावकर यांच्यासह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सुमारे दोन तास चाललेल्या या नाटकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवन प्रवासाला उजाळा देण्यात आला. या नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.