७ ऑक्टोबर पासून नव्हे “या” तारखेपासून आंगणेवाडीचं भराडी देवी मंदिर दर्शनाला होणार खुलं
मालवण : कोरोना प्रादुर्भावामुळे बंद असलेली मंदीरे ७ ऑक्टोबर पासून भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आंगणेवाडी येथील भराडी देवीचं मंदिर ७ ऑक्टोबरला नव्हे तर २५ ऑक्टोबर पासून भाविकांसाठी खुलं होणार आहे. याबाबतची घोषणा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी केली आहे.
कोरोनाचे निर्बंध शिथिल करताना ७ ऑक्टोबर २०२१ पासून शासनाने मंदिरे आणि प्रार्थना स्थळे उघडण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु प्रति वर्षाप्रमाणे आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी मंदिर घटस्थापनेनिमित्त ७ ऑक्टोबर पासून २४ ऑक्टोबर पर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीत पारंपारिक धार्मिक पूजा विधी होणार असल्याने नवस करणे, नवस फेडणे, ओटी भरणे आदी विधी बंद राहणार आहेत. २५ ऑक्टोबर पासून कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करून भाविकांना श्री भराडी देवीचे दर्शन घेता येईल. भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्या वतीने अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी केले आहे.