कचऱ्याच्या बिघडलेल्या नियोजनाला राजन वराडकर, गणेश कुशेच जबाबदार !

स्थायी समिती सभेत कचरा कामगारांची संख्या ३९ वरून १५ कोणी केली ?

मंदार केणींसह शिवसेना नगरसेवकांचा सवाल ; ठेकेदाराने यांची आर्थिक नाडी आवळताच ओरड सुरू

कुणाल मांजरेकर

मालवण शहरातील कचऱ्याचे राजकारण थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. उपनगराध्यक्ष राजन वराडकर आणि भाजप गटनेते गणेश कुशे यांनी कचऱ्याची उचल होत नसल्या प्रकरणी नगराध्यक्षांवर टीका केल्यानंतर आज बांधकाम सभापती मंदार केणी यांनी शिवसेना नगरसेवकांसह पत्रकार परिषद घेऊन कचऱ्याच्या बिघडलेल्या परिस्थितीला उपनगराध्यक्ष राजन वराडकर आणि गणेश कुशे यांना जबाबदार धरले. यापूर्वी शहरात कचरा उचलण्यासाठी ३९ कामगार कार्यरत होते. मात्र दोन वर्षांपूर्वी स्थायी समितीत असलेल्या बहुमताच्या जोरावर राजन वराडकर आणि गणेश कुशे यांनीच कचऱ्याची उचल करण्यासाठी १५ कामगारच घेण्यात यावे, असा ठराव केला. मालवण शहरात कचरा उचलण्यासाठी किती कामगार हवेत, याची माहिती असतानाही केवळ ठेकेदारावरील आकसापोटी असा निर्णय घेण्यात आला. वास्तविक हा ठेकेदार यांचाच होता, मात्र त्याने यांच्या आर्थिक नाड्या आवळल्याने ठेकेदाराशी यांचे बिनसल्याची टीका मंदार केणी यांनी केली.

नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या सत्तेच्या काळात भ्रष्टाचारमुक्त नगरपालिका म्हणून ओळख निर्माण झाली आहे. शहरात दर्जात्मक विकास करण्यात आला असून नगराध्यक्षांची प्रतिमा मलिन करण्याचे षडयंत्र उपनगराध्यक्ष राजन वराडकर आणि भाजपचे गटनेते गणेश कुशे यांनी आखल्याची टीकाही यावेळी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी नगराध्यक्षांच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केली. यावेळी नगरसेवक यतीन खोत, पंकज सादये, आकांक्षा शिरपुटे, दर्शना कासवकर तृप्ती मयेकर यांच्यासह किसन मांजरेकर, राजू परब आदी उपस्थित होते. यावेळी मंदार केणी म्हणाले, विकासकामांना नेहमी विरोध करण्याच्या यांच्या मानसिकतेमुळेच पालिकेत नेहमी २ विरुद्ध १६ असे चित्र पाहायला मिळते. या दोन सदस्यांच्या पोटात काय आणि ओठात काय हे सर्वांना समजून चुकले आहे. महेश कांदळगावकर यांच्या सत्तेच्या काळात पालिका भ्रष्टाचारमुक्त बनली असून ठेकेदारांनी देखील मोकळा श्वास घेतला आहे. पालिकेचे सत्ताधारी ठेकेदारांच्या कोणत्याही कामात हस्तक्षेप करीत नाहीत, असे ते म्हणाले.

मग त्यांनी भरपावसातील खड्डे बुजवण्याच्या कामाला हरकत का घेतली नाही ?

नगरपालिकेच्या प्रत्येक विकास कामांना विरोध करण्याचे धोरण या दोन नगरसेवकांच्या “मंडळाने” घेतल्याची टीका करून गणेश चतुर्थीच्या तोंडावर पालिकेमार्फत भर पावसात खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले होते. याबाबत सोशल मीडियावर नागरिक टीका करीत असताना या दोन नगरसेवकानी त्या कामाला विरोध का केला नाही ? संबंधित ठेकेदार कदाचित त्यांच्या मर्जीतील असल्याने याबाबत त्यांनी “ब्र” देखील काढला नसेल, ते गप्प राहिले असले तरी पालिकेमार्फत त्या ठेकेदाराला व्यवस्थित झालेल्याच कामाचे बील अदा केले जाणार आहे, असे मंदार केणी म्हणाले. नगराध्यक्ष यांनी सांगितलेल्या ठेकेदाराला काम देत नसल्याने त्यांच्यावर सूड उगवण्याचे काम वराडकर आणि कुशे करीत असल्याचा आरोप मंदार केणी यांनी केला.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!