व्यापाऱ्यांनो सावधान … तर तात्काळ व्यापारी संघाशी संपर्क साधा !
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांनी केलं आवाहन
कुणाल मांजरेकर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही बाजारपेठात ग्लोबल इन्सिट्यूट फॅार एज्यूकेशन ॲण्ड रिचर्स फाऊंडेशन या संस्थेचा कोणताही ठावठिकाण नसलेले एक पत्रक घेऊन काही मुले दुकानदारांकडे जाऊन अन्न सुरक्षा प्रशिक्षणा पोटी १ हजार रूपयांची मागणी करीत असल्याच्या तक्रारी महासंघाकडे आल्या आहेत. याबाबत अन्न सुरक्षा खात्याच्या अधिकाऱ्यांकडे महासंघाने चौकशी केली असता ‘अश्या कोणत्याही संस्थेला अन्न सुरक्षा खात्याने अश्या कोणत्याही प्रशिक्षण किंवा खात्याशी संबंधीत अन्य कोणतीही कामे करण्यासाठी नियुक्त केलेले नाही’ असे स्पष्ट केले आहे.
त्यामुळे अश्या प्रकारची पत्रके वाटून व्यापाऱ्यांची दिशाभूल करून व अन्न सुरक्षा खात्याची बाब आहे असे भासवून प्रशिक्षण किंवा परवाना नुतनीकरणाच्या नावा खाली पैश्याची मागणी करणाऱ्या कोणाही व्यक्तिला थारा देऊ नये. अश्या फिरणाऱ्या व्यक्ति बाजारपेठेत आल्यास स्थानिक व्यापारी संघ किंवा तालुका व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या तात्काळ निदर्शनास आणून द्यावे.
याचबरोबर खाद्य व अन्न पदार्थांचा व्यापार व्यवसाय करणाऱ्या ज्या व्यापाऱ्यांच्या अन्न परवानाची मुदत येत्या डिसेंबर मधे संपणार आहे, त्यांच्या परवान्यांचे ॲानलाईन नुतनिकरण करण्यासाठी पुढील महिन्यात जिल्ह्यातील सर्व व्यापार पेठातच महासंघातर्फे शिबिरे भरविण्यात येत आहेत. नविन परवाने काढणे व अन्न सुरक्षे संबंधी आवश्यक प्रशिक्षण आदी बाबतीत तालुका व्यापारी संघाच्या माध्यमातून महासंघातर्फे लवकरच स्वतंत्र व्यवस्था केली जात आहे. तरी कोणाही व्यापाऱ्याने घाईगडबडीत गांगरून जाऊन या बाबत कोणताही आर्थिक व्यवहार कोणाशीही करू नये, असे आवाहन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांनी केले आहे.