भाजपचंही ठरलं, ठाकरेंच्या “होऊ द्या चर्चा” ला जोरदार प्रत्युत्तर मिळणार !
“निवडणुकीतला फंडा, पत्रे देऊन घातला गंडा” ; आ. वैभव नाईकांच्या खोट्या पत्रांचा पाढा नाक्यानाक्यावर वाचणार
भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची माहिती ; स्वतःचे पाप झाकण्यासाठी मोदी सरकारवर टीका करण्याचा प्रयत्न
मालवण | कुणाल मांजरेकर
भाजपा सरकारच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने उद्यापासून “होऊ द्या चर्चा” अभियान राबवले जात आहे. याला उत्तर देण्यासाठी भाजपामार्फत देखील आमदार वैभव नाईक यांच्याकडून निवडणुकीत दिलेल्या खोट्या पत्रांचा पाढा नाक्यानाक्यावर वाचला जाणार असून सभाही घेतली जाणार आहे. “निवडणुकीतला फंडा, पत्रे देऊन घातला गंडा” याचा पोलखोल यातून केला जाणार आहे, अशी माहिती भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी दिली आहे.
होऊदे चर्चा याला उत्तर म्हणून प्रत्येक निवडणुकीत आमदारांनी आश्वासनांची खैरात करुन आणि पत्रांचा फंडा करुन लोकांना जो गंडा घातला, त्याचा पाढा प्रत्येक नाक्यानाक्यावर वाचला जाणार आहे. तसेच सभाही घेतल्या जाणार आहेत. केंद्रीय मंत्री नारायणराव राणे आणि पालकमंत्री रविंद चव्हाण यांच्या माध्यमातून माजी खासदार निलेश राणे यांनी ज्या ज्या कामांचा पाठपुरावा करुन विकास कामे मंजूर करुन घेतली, त्यांची लेखी माहिती नाक्या नाक्यावर दिली जाणार आहे. सिंधुदुर्गातील जनतेला कोण काय करतं, याची माहिती देण्याची गरज नाही. कारण या जिल्ह्यातील जनता सुज्ञ आहे. गावागावात खड्ड्यांच साम्राज्य, दर्जाहीन झालेली कामे त्याचे पाप झाकण्यासाठी मोदी सरकारवर टीका करण्याचा खटाटोप ठाकरे गटाकडून सुरू आहे, असे धोंडू चिंदरकर यांनी म्हटले आहे.