शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने उद्या मालवणात “होऊ द्या चर्चा”
पोईप बाजारपेठ, फोवकांडा पिंपळ येथे कार्यक्रम ; राज्यकर्त्यांच्या कारभाराची “पोलखोल” करणार : हरी खोबरेकर यांची माहिती
मालवण : राज्यात अराजकता वाढली आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांना दिलेली खोटी आश्वासने, चुकीचे शैक्षणिक धोरण यांमुळे जनतेच्या मनात खदखद निर्माण झाली असून यासारख्या अन्य विषयांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी हिंदुत्वा सारखे मुद्दे समोर आणले जात आहेत. त्यामुळे जनतेमध्ये जागृती करण्यासाठी आणि जनतेच्या मनातील असंतोषाला बाहेर काढण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते गुरुनाथ खोत यांच्या नेतृत्वाखाली उद्या बुधवारी ४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता पोईप बाजारपेठ तर सायंकाळी ५ वाजता शहरातील फोवकांडा पिंपळ येथे ‘होऊ दे चर्चा’ हा जनतेशी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील ठाकरे गटाच्या कार्यालयात ही पत्रकार परिषद झाली. यावेळी महेश जावकर, मंदार ओरसकर, पूनम चव्हाण, महेंद्र म्हाडगुत, स्वप्नील आचरेकर, अनंत पाटकर, अक्षय रेवंडकर आदी उपस्थित होते. राज्यात वाढलेली अराजकता, शेतकऱ्यांची खोटी आश्वासने देऊन केलेली फसवणूक, वाढती बेरोजगारी, महागाई यामुळे जनतेमध्ये प्रचंड खदखद आहे. त्यामुळे या प्रश्नांबाबत जनतेत जागृती करण्यासाठी होऊ दे चर्चा हा उपक्रम हाती घेण्यात येत आहे. ४ ऑक्टोबर रोजी दुपारी पोईप बाजारपेठ येथे तर सायंकाळी फोवकांडा पिंपळ येथे हा कार्यक्रम होणार आहे. यात शिवसेना नेते गुरुनाथ खोत,खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, गौरीशंकर खोत, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, संग्राम प्रभुगावकर यांच्यासह अन्य पदाधिकारी सहभागी होणार आहेत. येत्या काळातही प्रत्येक बाजारपेठेत, गावागावात हा उपक्रम राबवित हिंदुत्वाचा विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन केले जात असलेले राजकारण, महागाई, शेतकरी, मच्छिमार तसेच रोजगाराचे प्रश्न याबाबत या बोलघेवड्या सरकारचा भांडाफोड करण्यात येणार असल्याचेही श्री. खोबरेकर यांनी स्पष्ट केले.