नौसेना दिनानिमित्त किल्ले सिंधुदुर्गचा परिसर होणार सुशोभित ; ८८ लाखांचा निधी मंजूर
भाजपा नेते निलेश राणे यांनी तत्कालीन पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा व सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली होती मागणी
मालवण | कुणाल मांजरेकर
नौसेना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी ४ डिसेंबर रोजी किल्ले सिंधुदुर्गवर येत आहेत. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग किल्ला परिसर सुशोभित व्हावा यासाठी प्रादेशिक पर्यटन व सार्वजनिक बांधकाम अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपा नेते निलेश राणे यांनी तत्कालीन पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्याजवळ केली होती. त्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून विशेष दुरुस्ती अंतर्गत सिंधुदुर्ग किल्ल्यावरील मंदिरांच्या सुशोभिकरणासाठी ८८ लाख १९ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
यामध्ये श्री देवी भवानी मंदिर परिसर सुशोभिकरणासाठी १४ लाख ५७ हजार, शिवराजेश्वर मंदीर परिसर सुशोभिकरणासाठी १७ लाख ७६ हजार, महापुरुष मंदिर परिसर सुशोभिकरणासाठी १७ लाख ७१ हजार, नगारखाना इमारत परिसर सुशोभिकरणासाठी १८ लाख ४२ हजार तर किल्ल्यावरील धर्मशाळा दुरुस्ती करिता १९ लाख ७० हजार असा एकूण ८८ लाख १९ हजार एवढा निधी उपलब्ध झाला आहे.