छत्रपती शिवरायांचा पुतळा किल्ले सिंधुदुर्गवरच उभारा, अन्यथा…

मनसेची भूमिका अमित इब्रामपूरकर यांनी केली स्पष्ट ; “तो” खासदार लोकसभेचा की राज्यसभेचा ते बाबा मोंडकर यांनी जाहीर करण्याची मागणी

मालवण | कुणाल मांजरेकर

नौदल दिनानिमित्त किल्ले सिंधुदुर्गवर उभारण्यात येणारा पुतळा कुठे बसवायचा यावरून नवीन वाद सुरु झाला आहे. या वादात मनसेने उडी घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्यांचा पुतळा किल्ले सिंधुदुर्गवरच उभारणे आवश्यक आहे. मात्र काही कारणास्तव हे शक्य न झाल्यास सिंधुदुर्ग किल्ल्याची जेथे पायाभरणी झाली, त्या ऐतिहासिक मोरयाचा धोंडा येथे छत्रपतींचा पुतळा उभारावा, ही मनसेची अधिकृत भूमिका असल्याची माहिती मनसेचे अमित इब्रामपूरकर यांनी दिली आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपतींचा पुतळा बसवण्यास विरोध करणारा खासदार लोकसभेचा की राज्यसभेचा, हे पर्यटन महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी जाहीर करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

याबाबत श्री. इब्रामपुरकर यांनी म्हटले आहे की, आताचे भारतीय नौदल म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातले आरमार दल. या आरमार दलाने भूमिपूजन नंतर प्रत्यक्ष बांधकामासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य याच आरमार दलाने कुरटे बेटावर नेले होते. निजामशाही कोकणात ताब्यात आल्यावर शिवाजी महाराजांनी कल्याण, भिवंडी व पेण येथे युद्धनौका बांधत पोर्तुगीजांना जेरीस आणले होते. शिवाजी महाराजांच्या नौसेनेचा परकीयांवर किती वचक होता हे लक्षात येते. म्हणून भारतीय नौदल आणि जिल्हा प्रशासन यांनी मोरयाचा धोंडा येथे पुतळा उभारण्याबाबत ठोस निर्णय घेत तसेच त्याच्या आजूबाजूच्या भागाचा पर्यटनदृष्ट्या विकास करून पर्यटकांना आकर्षित करून ठोस पाऊल उचलणे आवश्यक आहे. ही आमची भूमिका आहे.

४ डिसेंबर रोजी राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या उपस्थितीत यंदाचा नौसेना दिन हा राष्ट्रीय कार्यक्रम होत असल्याने त्याचाच एक भाग म्हणून शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात येणार आहे. परंतु जागा मालकांचे एकमत होत नसल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवण शहरात बसविण्याचा प्रयत्न केंद्र शासन करत आहे. शिवाजी महाराज हे देशाची अस्मिता आहे. त्यांचा पुतळा जर बसवायचा झाल्यास तो किल्ले सिंधुदुर्गवरच बसवण्यात यावा ही नागरिकांची आणि मनसेची भूमिका असून जर केंद्र शासनाला तिथे बसवण्यास अपयश आल्यास हा पुतळा ऐतिहासिक मोरयाचा धोंडा येथे बसवण्यात यावा. मोरयाचा धोंडा या गणेश, चंद्रसूर्य आणि शिवलिंग कोरलेल्या खडकाची पूजा करून तसेच सागराला सुवर्ण श्रीफळ अर्पण करून महाराजांनी किल्ले सिंधुदुर्गाच्या मुहूर्ताचा चिरा बसवला. म्हणूनच किल्ले सिंधुदुर्ग प्रमाणे मोरयाचा धोंडा यालाही ऐतिहासिक महत्त्व आहे. तसेच याठिकाणी असंख्य भाविक आपल्या मनातील इच्छित व्यक्त करुन आपला कार्यभाग इथे सोपवत असतात. ऐतिहासिक महत्व असल्याने मोरायचा धोंडा जतन करण्यासाठी आणि पर्यटकांचा ओढा वाढण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने भरीव निधी देण्याची मागणी इब्रामपूरकर यांनी केली आहे.

पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी किल्ले सिंधुदुर्गवर महाराजांचा पुतळा उभारण्यास एका खासदाराने विरोध केला असल्याचे म्हटले आहे. श्री.मोंडकर यांनी खासदार लोकसभेचा की राज्यसभेचा तेही सांगावे. किल्ले सिंधुदुर्ग आणि मालवण शहरात यंदाचा नौसेना दिन साजरा होत असल्याने मालवणातील तमाम जनतेला याचा अभिमान आहे. अशा लोकप्रतिनिधीमुळे नागरिकांच्या आनंदावर विरजण पडत असेल तर असे लोकप्रतिनिधी जनतेला समजतील. मुळात पुतळे बसवण्यापेक्षा गडकिल्ल्यांचे संरक्षण आणि संवर्धन करणे ही मनसेची भूमिका जरी असली तरी भारतीय नौदलाने नौसेना यानिमित्त ३५ फूट उंचीचा महाराजांचा पुतळा उभारण्याचा संकल्प केला असल्याने किल्ले सिंधुदुर्गवर उभारण्यास अडचणी आल्यास तो ऐतिहासिक मोरयाचा धोंडा येथे उभारला जावा असेही मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी स्पष्ट केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!