सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला “बँको ब्ल्यू रिबन २०२३” पुरस्कार जाहीर
५ ऑक्टोबर रोजी दमण येथे पुरस्कार वितरण
सिंधुनगरी (प्रतिनिधी) अविज पब्लिकेशन, कोल्हापूर या संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला “बँको ब्ल्यू रिबन २०२३” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ५ ऑक्टोबर रोजी दमण येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
अविज पब्लिकेशन, कोल्हापूर ही संस्था सहकार क्षेत्रासाठी देशपातळीवर एक मार्गदर्शक संस्था म्हणून १९९९ पासून कामकाज करीत असून, या संस्थेमार्फत विविध प्रकारच्या संस्थांची कामकाज पध्दती, सहकार क्षेत्रातील कायदे कानून व त्यामध्ये वेळोवेळी होणारे बदल, आधुनिक तंत्रज्ञाना बाबतची अद्यावत माहिती संकलन व प्रसिध्दीचे कामकाज केले जाते. बँकींग क्षेत्रावर होणारे हल्ले, बदलती टेक्नॉलॉजी, नवनवीन बँकींग संकल्पना, कर्जदारांची मानसिकता, बँकांचा एन.पी.ए याबरोबरच बँकींगमधील घडामोडी बाबतची अद्यावत माहिती बँको डायरीच्या माध्यमातून प्रसिध्द केली जाते. या संस्थेमार्फत प्रतिवर्षी सहकार क्षेत्रात देशपातळीवर कार्यरत असणाऱ्या व उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या विविध प्रकारच्या बँकिंग कामकाज करणाऱ्या संस्थांसाठी पुरस्कार प्रदान केले जातात. जिल्हा बँकेने आर्थिक मापदंडाचे उत्कृष्टरित्या पालन केल्याने तसेच राज्यातील जिल्हा बँकाविभागात ठेवींमधील केलेली वाढ, तसेच स्वमालकीचे डाटा सेंटर उभारुन सीबीएस प्रणालीद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करुन ग्राहकांना बँकींग क्षेत्रातील विविध प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल देशातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या गटातून सिंधुदुर्ग बँकेस “बँको ब्ल्यू रिबन २०२३” पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला यापूर्वी ७ वेळा बँको पुरस्काराने सन्मानीत केलेले आहे. या पुरस्कारांबद्दल जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी समाधान व्यक्त केलेले असून, या पुरस्कारांचे श्रेय त्यांनी बँकेचे संचालक, अधिकारी / कर्मचारी व ग्राहक यांना दिलेले आहे. तसेच भविष्यात जिल्हा बँकेकडून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे विविध प्रकारच्या सेवा-सुविधा ग्राहकांना उपलब्ध करुन देऊन बँकेच्या “आपली माणसं आपली बँक” या ब्रिदवाक्याप्रमाणे बँकेचे कामकाज यापुढेही चालू राहील, अशी ग्वाही दिली आहे.