… तर सिंधुदुर्गातील पोल्ट्री व्यवसायाला नवं बळ मिळेल ; वाडोस येथील मेळाव्यात विश्वास

युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून वाडोस येथे पोल्ट्री व्यावसायिकांचा भव्य मेळावा संपन्न

कुणाल मांजरेकर

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी माजी खासदार निलेश राणे यांच्या सूचनेनुसार युवा नेते विशाल परब यांच्यावतीने कुडाळ तालुक्यातील वाडोस येथे पोल्ट्री व्यावसायिकांचा मेळावा संपन्न झाला.
पोल्ट्री व्यावसायिकांसाठी सिंधुदुर्गात जिल्ह्यात स्लॉटर हाऊस किंवा कटिंग प्लांट यावेत यासाठी युवानेते विशाल परब हे प्रयत्नशील आहेत. या संदर्भात केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांची दिल्ली येथे भेट घेतल्यानंतर भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांनी जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक आणि पोल्ट्री व्यवसायात येण्यास इच्छुक असणाऱ्या युवकांचा मेळावा घेऊन चर्चासत्र आयोजित करावं आणि त्यांच्या मागण्या विचारात घेण्याच्या सूचना विशाल परब यांना दिल्या होत्या. या सूचनेनुसार विशाल परब यांनी रविवारी कुडाळ तालुक्यातील वाडोस येथे हा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात गेल्या दहा वर्षांपासून पोल्ट्री व्यवसायात असणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या स्लॉटर हाऊस, प्रस्थापित कंपन्या, हॅचरीज, उत्पादन क्षमता, भाग भांडवल, या विषयात आपल्या समस्या मांडल्या. जिल्ह्यात स्लॉटर हाऊस का गरजेचं आहे किंवा सध्या पोल्ट्री व्यवसायात काय समस्या आहेत याचे वास्तव मांडले. आपल्या समस्या विशाल परब यांच्या माध्यमातून राणे साहेबांपर्यंत जातील आणि त्यांचा थेट दिल्लीतून विचार होईल, अशी खात्री उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या माध्यमातून माजी खासदार निलेश राणे व युवानेते विशाल परब यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात देशपातळीवरील दोन मोठ्या कंपन्या व्यवसाय करण्यास तयार झाल्या आहेत. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्लॉटर हाऊस सुरू केल्यास आज केवळ माणगाव खोरे किंवा कुडाळ तालुक्यापुरता मर्यादित असलेला पोल्ट्री व्यवसाय हा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात विस्तारित होऊन त्याचा फायदा जिल्ह्यातील तरुणांना मिळेल. आज जिल्ह्यात स्लॉटर हाऊस नसल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या कार्यरत असणाऱ्या कंपन्या या गोवा किंवा बेळगांव येथील स्लॉटर हाऊसवर अवलंबून आहेत. त्याचा तोटा म्हणजे कुडाळ तालुका वगळता या कंपन्या इतर तालुक्यातील शेतरकऱ्यांशी करार करत नाहीत. परिणामी इच्छा असूनही देवगड, कणकवली, वैभववाडी, मालवण या तालुक्यातील युवक या क्षेत्रात उतरू शकत नाहीत. मात्र माणगाव येथे स्लॉटर स्लॉटर हाऊस झाल्यास याचा फायदा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला होणार आहे.

या मेळाव्यास माजी सभापती मोहन सावंत, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दादा साईल, कुडाळ भाजपा मंडल अध्यक्ष विनायक राणे, मालवण भाजपा मंडल अध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, योगेश बेळणेकर, राजा धुरी, दिनेश शिंदे या सोबत अनेक पदाधिकारी पोल्ट्री व्यवसाय संबंधी तज्ञ व शेकडोच्या संख्येने पोल्ट्री व्यावसायिक उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!