बेकायदा वाळू उपसा : “त्या” होड्यांच्या मालकांचा पोलिसांकडून शोध सुरू
४८ भैय्या कामगारांना अटक ; न्यायालयाकडून वैयक्तिक जात मुचलक्यावर सुटका
कुणाल मांजरेकर
कर्ली खाडीपात्रात देवबाग गावात बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या चार होड्या शनिवारी सकाळी स्थानिक ग्रामस्थांनी पकडून महसूल विभागाच्या ताब्यात दिल्या होत्या. या प्रकरणी महसूल विभागाकडून पोलिसांत फिर्याद दाखल केल्यानंतर चार होड्यांवरील ४८ भैय्या कामगारांना पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. या सर्वांना रात्री न्यायालयात हजर केले असता सर्वांची वैयक्तिक जात मुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, या होड्यांचे वेंगुर्ला, कुडाळ तालुक्यातील तीन मालक अद्याप पोलिसांच्या हाती लागले नसून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती मालवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फारणे यांनी रविवारी दिली.
शनिवारी देवबाग ग्रामस्थांनी अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्या चार बोटी पकडून महसूल विभागाच्या ताब्यात दिल्या होत्या. महसूल विभागाने वाळूसह या बोटी सील करत ४८ वाळू उपसा कामगारांना ताब्यात घेतले होते. या घटनेत मुकेश नामदेव सारंग (कोरजाई) यांच्या बोटीत ६ ब्रास वाळू, लीलाधर जगदीश खोत (कोरजाई) यांच्या बोटीत २ ब्रास वाळू, सागर परब (कुडाळ) यांच्या दोन बोटीत ७ व ८ ब्रास वाळू अशी चार बोटीत एकूण २३ ब्रास वाळू सापडली होती. वाळूसह बोटी महसूल प्रशासनाने सील करून किनाऱ्यावर ठेवून पोलीस पाटलांच्या ताब्यात दिल्या आहेत. या तीन बोट मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र त्यापैकी कामगारांवर कारवाई झाली असली तरी अद्यापही बोट मालकांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.