अखेर आंबडोस ग्रामपंचायतीत “कमळ” फुलले ; सरपंच, उपसरपंचांसह ग्रा. पं. सदस्य भाजपात !

केंद्रीयमंत्री नारायण राणे, माजी खा. निलेश राणेंचे नेतृत्व, दत्ता सामंत यांची खंबीर साथ यांमुळेच विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन भाजपात जाण्याचा निर्णय : सरपंच सुबोधिनी परब

मागील ९ वर्षात शिल्लक राहिलेला विकासाचा बॅकलॉग भरून काढत मालवण – कुडाळ मतदार संघ महाराष्ट्रात “टॉप ५” मध्ये आणण्याचे व्हिजन : निलेश राणेंचे उद्गार

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यातील आंबडोस ग्रामपंचायतीवर अखेर भाजपाचा झेंडा फडकला आहे. येथील सरपंच सौ. सुबोधिनी राजेश परब, उपसरपंच रामदास रमेश नाईक यांच्यासह सदस्यांनी माजी खासदार निलेश राणे, दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे, माजी खा. निलेश राणेंचे नेतृत्व, दत्ता सामंत यांची खंबीर साथ यांमुळेच विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन भाजपात जाण्याचा निर्णय आम्ही घेतल्याची माहिती सरपंच सुबोधिनी परब यांनी यावेळी दिली. तर मालवण कुडाळ मतदार संघाचा मागील ९ वर्षात शिल्लक राहिलेला विकासाचा बॅकलॉग भरून काढत मालवण – कुडाळ मतदार संघ महाराष्ट्रात “टॉप ५” मध्ये आणण्याचे आपले उद्दिष्ट असल्याचे निलेश राणे यांनी सांगितले. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून गतिमान विकास होत असताना आता नजर जाते तिथे भाजपा पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मालवण कुडाळ मतदारसंघात भाजप पक्षात प्रवेश करणाऱ्यांची यादी मोठी आहे. हे पक्षप्रवेश होत असताना गावच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याचा आपला प्रयत्न आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही या मतदार संघातून भाजपचा विजय निश्चित आहे. असा ठाम विश्वास देखील निलेश राणे यांनी सांगितले.

आंबडोस येथील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच यासह सदस्य व अनेक ग्रामस्थांनी श्री देव रवळनाथ मंदिर येथे निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला. गावच्या विकासाला सर्वाधिक प्राधान्य देत सर्व विकासकामे शासनाच्या माध्यमातून प्राधान्याने मंजूर करून दिली जातील. आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत असा विश्वास निलेश राणे यांनी प्रवेशकर्त्यांना दिला. दरम्यान दत्ता सामंत यांच्या माध्यमातून श्री देव रवळनाथ मंदिर परिसर येथे बसवण्यात येणाऱ्या पेव्हर ब्लॉक कामाचा शुभारंभ निलेश राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत, सरपंच सौ. सुबोधिनी राजेश परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी वित्त व बांधकाम सभापती अनिल कांदळकर, माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई, सुधीर साळसकर, कुडाळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, दादा साईल, विनायक राणे, माजी नगरसेवक दीपक पाटकर, चौके माजी सरपंच राजा गावडे, माजी उपसभापती छोटू ठाकूर, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंदार गावडे, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, दया देसाई, राजू बिडये, संग्राम साळसकर, धोंडी नाईक, माजी सरपंच विष्णू परब, माजी सरपंच राधा वरवडेकर, प्रशांत नाईक, आबाजी पालकर, राजू कदम, अनंत कदम, यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

आम्हाला कोणावर टीका करायची नाही. मात्र, मागील नऊ वर्षे हा मतदार संघ विकासाबाबत मागे राहिला. विधानसभेत या मतदारसंघाचा उल्लेख होत नाही. मात्र, राणेसाहेबांची ओळख असलेला हा मतदारसंघ यापुढे पुन्हा एकदा गतिमान विकासाच्या माध्यमातून अग्रक्रमावर राहील. आम्ही या मतदारसंघाचा रखडलेला विकास पूर्ण असेही, असेही निलेश राणे यांनी स्पष्ट केले.

मालवण कुडाळ मतदार संघाचा विचार करता गेल्या ९ वर्षात विकासकामांअभावी अनेक कामे ओसाड पडली. मात्र, आता पुन्हा विकासाची दारे राज्य सरकार भाजप युती सरकारच्या माध्यमातून खुली झाली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारच्या माध्यमातून तसेच केंद्र सरकारच्या विविध योजनाच्या माध्यमातून विकासनिधी मतदारसंघात येत आहे. डीपीडिसीच्या निधीत वाढ करण्याबाबत आपण मागणी केल्यानुसार राज्य सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. डीपीडिसीचा निधी वाढत आहे. प्रत्येक गावात मागील नऊ वर्षातील विकासनिधीचा बॅकलॉग भरून काढण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. हा मतदारसंघ आदर्शवत बनवून महाराष्ट्रात टॉप ५ मध्ये राहावा हेच आपले प्रयत्न आहेत. असे निलेश राणे यांनी सांगितले. यावेळी दत्ता सामंत यांचे विशेष कौतुक निलेश राणे यांनी केले. जे अनेक पक्षप्रवेश होत आहेत त्यात दत्ता सामंत यांचा मोलाचा वाटा आहे. राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना त्यांनी अनेक माणसे जोडली. स्वतःच्या खिशातूनही अनेकांना ते मदत करत असतात. जिथे देऊळ दिसेल तिथेही सढळ हस्ते मदत त्यांची असते. त्यांचे हे हे दातृत्व म्हणजे राणे साहेबांचे विचार आहेत. असेही कौतुकोद्गार निलेश राणे यांनी दत्ता सामंत यांच्या प्रती व्यक्त केले.

आज अनेक पक्षातून अनेकजण भाजपात पक्षप्रवेश करत आहेत . एक कुटुंब म्हणून एकसंघ काम करत असताना विकासकामांबाबत सर्वांच्या मागण्या शासनाच्या माध्यमातून पूर्ण करणे ही आमची जबाबदारी आहे. उद्योग व्यवसाय वाढून रोजगारनिर्मिती वाढवण्यावर विशेष प्रयत्न असल्याचे निलेश राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच आमडोस गावातील सर्वांवर राणे साहेबांचे विशेष प्रेम होते त्यांचप्रमाणे गावातील सर्व जेष्ठ ग्रामस्थ आमच्या मनात आहेत. असेही निलेश राणे यांनी आदरपूर्वक सांगितले.

२५ हजारापेक्षा जास्त मताधिक्याने निलेश राणे यांचा विजय निश्चित ; दत्ता सामंत

यावेळी दत्ता सामंत म्हणाले, आंबडोस गाव हा अनेक वर्षांपासून राणे साहेबांवर प्रेम करणारा गाव आहे. अन्य गावांप्रमाणे या गावातही मोठ्या प्रमाणांत विकास करताना त्यांनी रस्त्यांचे जाळे निर्माण केले. मात्र, मागील ९ वर्षात विकासकामांत या गावासह अनेक गावे मागे पडली. मात्र, आता निलेश राणे यांच्या नेतृत्वात हा मतदारसंघ व या दोन्ही तालुक्यातील सर्व गावांनी विकासाची गती पुन्हा पकडली आहे. निलेश राणे हे सर्व करत असताना राजकारण डोळ्यासमोर ठेऊन काहीच करत नाहीत. मात्र, त्यांनी निवडणूक लढवावी हा आम्हा सर्वांचा आग्रह आहे. माणुसकी जपणारे हे नेतृत्व आज आमदारा पेक्षा दुप्पट वेगाने काम करत आहे. २०२४ साली निश्चितच निलेश राणे २५ हजारापेक्षा जास्त मतांनी निवडून येतील असा विश्वास दत्ता सामंत यांनी व्यक्त केला. यासोबतच मागील आठवणींना उजाळा देताना २०१९ च्या निवडणुकीत माझा उमेदवारी अर्ज बाद ठरला. त्यावेळी आपण हायकोर्टात जाऊया निश्चितच तुम्हाला न्याय मिळेल. मी तुमच्या सोबत आहे हे सांगणारे निलेश राणेच होते. मात्र, आपण कोर्टात गेलो नाही. याचाही आवर्जून उल्लेख दत्ता सामंत यांनी केला. यावेळी सुदेश आचरेकर यांनीही विचार मांडताना निलेश राणे यांच्या माध्यमातून गावागावात तसेच मालवण शहरात सुरू असलेल्या विकासात्मक कामांबाबत माहिती दिली. तसेच दत्ता सामंत यांच्याही कार्याचे कौतुक केले.

विकासाच्या दृष्टीने भाजपात प्रवेश : सरपंच

सरपंच सुबोधिनी परब म्हणाल्या, विकासाचा दृष्टिकोन ठेऊन आपण भाजपात प्रवेश करत आहे. भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे, मालवण कुडाळ मतदारसंघाचे प्रमुख निलेश राणे यांचे सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात असलेले मोठे योगदान सरकारच्या माध्यमातून मोठा विकासनिधी उपलब्ध करून देण्याची धमक तसेच देवमाणूस स्वरूपात नारायण राणेंच्या विचाराने कार्यरत असणारे दत्ता सामंत या सर्वांच्या माध्यमातून गावात रस्ते, वीज, पाणी या मूलभूत गरजा सोबतच रोजगार निर्मिती, मानवी विकास, हाच आपला दृष्टिक्षेप राहणार आहे. असे सरपंच सुबोधिनी परब यांनी सांगितले. सरपंच यांच्या गावाप्रति असलेल्या सर्वांगीण विकासात्मक भावानांचे निलेश राणे यांनी विशेष कौतुक करत आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

प्रवेशकर्ते आमडोस सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ

सरपंच सुबोधिनी राजेश परब, उपसरपंच रामदास रमेश नाईक, सदस्य सौ. श्रद्धा शिरीष नाईक, सौ. अदिती अजय परब, सौ. सुलभा चंद्रकांत परब, सतीश सुरेश दळवी, प्रवीण रामचंद्र मराळ यासह व्हाळ वाडी व कदम वाडी येथील अनेक ग्रामस्थ व उबाठा गटाचे कार्यकर्ते यांनी भाजपात प्रवेश केला अशी माहिती दत्ता सामंत यांनी दिली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!