गणेशोत्सवाच्या तोंडावरही मालवण शहरातील मुख्य रहदारी मार्गांवरील अनेक स्ट्रीट लाईट बंद
काँग्रेसचे ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळू अंधारी यांनी वेधले पालिकेचे लक्ष ; तातडीने दुरुस्तीची मागणी
मालवण : गणेशोत्सव सण अवघ्या आठ ते दहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र अद्यापही मालवण शहरातील अनेक मार्गांवरील स्ट्रीट लाईट बंद आहेत. तसेच काही मार्गांवर दिवसा स्ट्रीट लाईट चालू आणि रात्री बंद अशीही स्थिती आहे. त्यामुळे या स्ट्रीट लाईट तातडीने सुरु कराव्यात, अशी मागणी काँग्रेसचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष महेश उर्फ बाळू अंधारी यांनी पालिका प्रशासनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
मालवणची ओळख पर्यटन केंद्र म्हणून आहे. याचा विचार करता तसेच आगामी सण उत्सव, सर्वच मार्गांवर वाढणारी गर्दी या सर्वांचा विचार करता मालवण मार्गांवरील स्ट्रीट लाईट चालू स्थितीत असणे आवश्यक आहे. मात्र अनेक स्ट्रीट लाईट बंद आहेत. मालवण शहर मुख्य रहदारी मार्गांवर रात्री पाहणी सर्व्हे केला असता अनेक स्ट्रीट लाईट बंद स्थितीत दिसून आल्या या सर्वांचे वीज खांब नंबर बाळू अंधारी यांनी निवेदनाच्या माध्यमातून पालिका मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना सादर केले असून तात्काळ कार्यवाहीची मागणी केली आहे. दरम्यान हायमास्ट व स्ट्रीट लाईट दुरुस्ती कामे सुरु आहेत. बंद स्ट्रीट लाईट लवकरात लवकर सुरु केल्या जातील असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी लायन्स क्लब मालवण अध्यक्ष विश्वास गावकर, सरदार ताजर, गणेश पाडगावकर उपस्थित होते.